मुंबई – सर्वसामान्य नागरिकांशी पोलीस उर्मटपणे वागत असल्याचा अनुभव अनेकदा येतो. असाच एक प्रकार मुंबईच्या व्ही पी मार्ग पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे. एका प्रकरणात तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरूणांची तक्रार दाखल करून न घेता उलट पोलिसांनी त्यांनाच दमदाटी केली. यावेळी एका महिला पोलिसाने आपल्या गणवेषावरील नेमप्लेट काढून तरूणीच्या चेह-यावर फेकून मारली. सुदैवाने तिचा डोळा वाचला आहे. या तरूणांनी पोलिसांच्या मुजोरपणाचा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून सध्या ही चित्रफित समाजमाध्यमवर व्हायरल होत आहे. अखेर पोलीस उपायुक्तांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?

यश कारंडे हा तरूण व्यायाम प्रशिक्षक (फिटनेस ट्रेनर) आहे. एका व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी तो खेतवाडी येथील ड्रीम व्हेवर्स च्या कार्यालयात गेला होता. मात्र त्या मालकाने कारंडे आणि त्याचा मित्र जयेश याला धक्काबुक्की करत मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी यश कारंडे आपल्या सहकार्यांसह व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गेला. आपली तक्रार घेऊन न्याय देतील असे त्याला वाटले पण घडले भलतेच..

पोलीस ठाण्यात काय घडलं?

पोलिसांनी तक्रार न घेता वरिष्ठ येतील तेव्हा यायला सांगितलं. दुसरीकडे ज्यांच्याविरोधात तक्रार द्यायला गेले त्यांना खास वागणूक देण्यात येत होती. पोलीस यश आण आणि त्याच्या मित्रांना दमदाटी करत होते. यामुळे यशने आपल्या मोबाईलने चित्रिकरण सुरू केले. आमची तक्रार घ्या असे ते पोलिसांना सांगत होते. मात्र पोलीस त्यांचे एकून घेत नव्हते. यामुळे तरूण संतप्त झाले.

तरुणीवर महिला पोलिसाने नेमप्लेट फेकून मारली

पोलीस आणि तरूणांमधील वाद वाढला. यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षकांचा संयम सुटला आणि त्यांनी आपल्या गणवेषावर लावलेली नेमप्लेट काढून तरुणीच्या चेहऱ्यावर फेकली. सुदैवाने तिचा डोळा वाचला. पोलिसांची ही कृती म्हणजे निव्वळ दादागिरी आणि मुजोरपणा आहे, असे यशने म्हटले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करावी, मारहाण करणार्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्याने केली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे चौकशी

यश कारंडे यांने पोलिसांच्या अरेरावीची चित्रफित आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केली आहे. ही चित्रफित व्हायरल होत असून पोलिसांच्या दादागिरीविरोधात संताप व्यक्त होत आहे. अखेर या प्रकरणाची दखल घेत पोलीस उपायुक्त मोहीत गर्ग यांनी या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडे सोपवली आहे. सोमवारपासून ही चौकशी केली जाणार आहे.

समाज मध्यामावर संतप्त प्रतिक्रिया

पोलिसांच्या या दादागिरीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करणयाची मागणी समाजमाध्यावर करण्यात येत आहे. ‘पोलीस हे वर्दीतील गुंड आहेत’, ‘अधिकाराचा गैरवापर केला जात आहे’, ‘हा खाकी वर्दीचा माज आहे’ अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहे. ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या राज्यात हे काय चाललंय? असा सवाल एकाने केला आहे. ‘सामान्य माणसाने आपल्या अन्यायाविरोधातही बोलायचं नाही. बोललं की सरकारी कामात अडथळा आणल्याचं दाखवून उलट कारवाई करतात’ असे एकाने म्हटले आहे. ‘पोलीस खात्यात कामाचा ताण असेल तर सोडून द्या अनेक चांगले उमेदवार पोलीस दलात येण्यासाठी प्रतीक्षेत आहे’, अशी मते व्यक्त केली जात आहेत. ‘हे जनतेच रक्षक आहेत की जनतेला मारण्यासाठी आहेत’ असाही संतप्त प्रश्नही एकाने उपस्थित केला आहे.