लेप्टोची साथ आटोक्यात आणण्यासाठी एकीकडे परिसरातील सर्व घरांतील तापाच्या रुग्णांवर उपचार करण्याची मोहीम पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केली असली तरी केवळ गोरेगाव ते दहिसर भागातच लेप्टोचे एवढे बळी जाण्याचे कारण अजूनही उमगलेले नाही. संपूर्ण मुंबईत पाणी तुंबलेले असताना केवळ काही परिसरांतच झालेल्या या मृत्यूचे कोडे सोडवण्यासाठी पालिका स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
आठवडय़ाभरात लेप्टोचे २१ रुग्ण आढळून आले. हे रुग्ण शहरभरात सर्वत्र असले तरी लेप्टोमध्ये महालक्ष्मी येथील एका रुग्णाचा मृत्यू वगळता इतर ११ मृत्यू मालाड ते दहिसरमध्ये झाले. यामागचे निश्चित कारण अजूनही लक्षात आलेले नाही. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या. प्राथमिक स्तरावर रोगाचे लक्षण व उपचार योग्य प्रकारे न झाल्याचे दिसत आहे. बारापैकी नऊ जणांचा मृत्यू अवघ्या एका दिवसात झाला आहे. यापुढे अशी घटना झाल्यास पुढील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी लेप्टोच्या जीवाणूंमध्ये काही बदल झाला आहे का, त्याचा अभ्यास करावा लागेल, असे कस्तुरबा रुग्णालयातील संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले. पालिका उंदरांना मारण्यासाठी मोहीम हाती घेते, मात्र लेप्टोचा जीवाणू फक्त उंदरांमध्ये नसतो, तो भटके  कुत्रे, पाळीव पशूंमध्येही असतो. कुत्र्यांना मारण्यावर बंदी असताना केवळ उंदीर मारण्याने फरक पडणार नाही, अशी माहिती आणखी एका अधिकाऱ्याने दिली.