मुंबई : म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के योजनेअंतर्गत खासगी विकासकांकडून घरे मिळत नसल्याने म्हाडाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. परिणामी नाशिक मंडळाला सध्या २० टक्के योजनेतील ५५५ घरे मिळाली असून आता त्यांच्या सोडतीची तयारी मंडळाने सुरु केली आहे. त्यानुसार आठवड्यात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

सर्वसामान्यांना खासगी विकासकाच्या प्रकल्पातील घरे परडणाऱया दरात उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने २० टक्के घरे राखीव ठेवण्याची योजना आणली. त्यानुसार मुंबई वगळता १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रातील, चार हजार चौ. मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पातील २० टक्के घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे, असे असताना नाशिकमधील विकासक मात्र २० टक्क्यातील घरे देण्यास टाळाटाळ करत आहेत. मोठ्या संख्येने या योजनेतील घरे म्हाडास प्राप्त न झाल्याने दीड-दोन वर्षांपूर्वी म्हाडाने कठोर पाऊले उचलत विकासकांना नोटीसा बजावली होती. नाशिक महानगर पालिका आणि जिल्हाधिकाऱयांकडे पाठपुरावा सुरु केला असून विकासकांविरोधात कडक कारवाईचे संकेतही म्हाडाने दिले आहेत. मात्र त्यानंतरही मोठ्या संख्येने विकासकांकडून घरे येणे बाकी आहे. आजच्या घडीला अंदाजे ५००० घरांची प्रतीक्षा नाशिक मंडळाला आहे. विकासक, नाशिक पालिका याप्रश्नी ठोस भूमिका घेत नसल्याने म्हाडाने काही दिवसांपू्र्वी नगरविकास विभागाला पत्र लिहून २० टक्क्यांतील घरे मिळावीत यासाठी विकासकांनी आदेश देण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा…आंब्याची पहिली पेटी वाशी बाजारात जाणून घ्या, हंगामातील आवक कशी राहणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या संख्येने विकासक म्हाडाला घरे देण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र म्हाडाच्या कठोर कारवाईनंतर काही प्रमाणात का होईना पण नाशिक मंडळाला घरे मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत नाशिक मंडळाला १४८५ घरे मिळाली आहेत. त्यापैकी १३२८ घरांची सोडत काढण्यात आली आहे. तर आता मंडळाला आणखी ५५५ घरे उपलब्ध झाली आहेत. या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय नाशिक मंडळाने घेतला असून त्यानुसार सोडतीची तयारी सुरु आहे. आठवड्याभरात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी दिली. नाशिक मंडळाला २० टक्क्यांत प्राप्त झालेली ५५५ घरे अत्यल्प आणि अल्प गटातील आहेत. या घरांच्या किंमती नेमक्या किती आहेत, घरे कोणत्या परिसरातील आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.