मुंबई : कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्याने राज्यातील शिक्षणशास्त्राच्या २९५ महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय एनसीटीईने घेतला. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्यातील डी.एड, बी.एड, बी.पी.एड, डी.ईएल.एड आणि एम.एड या शिक्षणशास्त्रातील १६ हजार ३१३ जागा कमी होणार आहेत. यामध्ये डी.ईएल.एड या अभ्यासक्रमाच्या सर्वाधिक जागा कमी होणार असून डी.एड व बी.एड अभ्यासक्रमांच्या जागाही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

देशभरातील विविध शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांची दुर्दशा उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने सर्व मान्यता प्राप्त शिक्षक शिक्षण संस्थांना २०२१-२२ आणि २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी परिषदेच्या पोर्टलवर ऑनलाईन कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अंतिम मुदतीनंतर जवळपास दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर महाराष्ट्रातील २९५ महाविद्यालयांनी कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अहवाल सादर न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता २०२५-२६ पासून रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने घेतला आहे. त्यामुळे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षामध्ये या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया राबविता येणार नाही. त्यामुळे यावर्षी शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्रत या शाखांच्या राज्यातील जवळपास १६ हजार ३१३ जागा कमी होणार आहेत. यामध्ये डी.ईएल.एड म्हणजे डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन या अभ्यासक्रमांच्या सर्वाधिक ७ हजार ५२४ जागा कमी होणार आहे. त्याखालोखाल शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड) अभ्यासक्रमाच्या ४ हजार ५१४ जागा, शिक्षणशास्त्र पदवीच्या (बीएड) २४३० जागा, शारीरिक शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.पी.एड) ९५० जागा आणि शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एम.एड) ८९५ जागा कमी होणार आहेत.

राज्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात डी.एड अभ्यासक्रमाच्या ३१ हजार ७ इतक्या जागा होत्या. परिषदेच्या निर्णयामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात डी.एडच्या ४ हजार ५१४ जागा कमी होणार आहेत. त्याचप्रमाणे बी.एड अभ्यासक्रमाच्या ३६ हजार ४३३ जागांपैकी २ हजार ४३० जागा, बी.पी.एडच्या ६ हजार १० पैकी ९५० जागा आणि एम.एड. च्या २ हजार ८८७ जागांपैकी ८९५ जागा कमी होणार आहेत. त्यामुळे शिक्षणशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांना यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.

अभ्यासक्रम व कमी होणाऱ्या जागा

डी.ईएल.एड – ७५२४ जागा

डी.एड – ४५१४ जागा

बीएड – २४३० जागा

बी.पी.एड – ९५० जागा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एम.एड – ८९५ जागा