मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर – इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. हा २५ किमी लांबीचा टप्पा सोमवार, ४ मार्च रोजी वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली. सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हा टप्पा कार्यान्वित झाल्यास नागपूर – इगतपुरी थेट प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा… झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी लांबीचा असून या महामार्गावरील नागपूर – भरवीर दरम्यानचा ६०० किमीचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. भरवीर – इगतपुरी या तिसऱ्या आणि इगतपुरी – आमणे या चौथ्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. भरवीर – इगतपुरी टप्प्याचे काम आतापर्यँत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणांमुळे या टप्प्यास विलंब झाला. आता या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. काम पूर्ण झाल्याने हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास एकूण ६२५ किमी लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल. इगतपुरी – आमणे टप्प्याचे काम वेगात पूर्ण करणे हे एमएसआरडीसीचे लक्ष्य आहे. इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – नागपूर थेट अतिवेगवान प्रवास करता येणार आहे.