मुंबई : ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक मंजुरीसाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य १७ ते १९ मे दरम्यान तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवार, १७ मे रोजी ही समिती राज्याचे गृह, अर्थ, विधि, शिक्षण, शिष्टाचार, निवडणूक या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर, तर सोमवारी ही समिती राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे.

भाजपचे खासदार पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ३१ खासदारांची ही समिती सर्व राज्यांतील वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांशी चर्चा करीत आहे. या समितीत राज्यातील सुप्रिया सुळे, डाॅ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक संसदेत मांडले होते. या विधेयकावर अभ्यास करण्यासाठी ३१ खासदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व राज्यांना भेटी देत आहे.

‘एक देश एक निवडणूक’ देशासाठी योग्य की अयोग्य, याचा अहवाल ही समिती तयार करणार आहे. समितीत भाजपचे १०, काँग्रेसचे तीन, समाजवादी, तृणमूल काँग्रेस, डीएमके, टीडीपी, राष्ट्रवादी, ‘आरएलडी’चे मिळून २१ सदस्य आहेत. इतर सदस्य हे अधिकारी आहेत. २०२९ मध्ये लोकसभेबरोबरच देशातील सर्व निवडणुका घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.