मुंबई : भारताने बुद्धिबळाच्या जागतिक पटावर चौथ्या स्थानी झेप घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षक, संयोजक ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्याशी बुधवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’च्या माध्यमातून देशाच्या बुद्धिबळातील प्रगतीबाबत संवाद साधला जाणार आहे.

१९९७ साली वयाच्या २१व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या कुंटेने भारताचा जागतिक बुद्धिबळातील अगदी तळापासून ते महासत्ता बनण्यापर्यंतचा प्रवास खूप जवळून अनुभवला आहे. कुंटेने खेळाडू आणि मग प्रशिक्षक म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेत सरकारने त्याला प्रतिष्ठेच्या ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्याच्या मार्गदर्शनात भारताने यंदा ‘फिडे’ ऑनलाइन ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य, तर महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने रौप्यपदकावर नाव कोरले. या कामगिरीत द्रोणावल्ली हरिकासारख्या अनुभवी खेळाडूसह आर. वैशाली आणि आर. प्रज्ञानंद यांनी बहुमूल्य योगदान दिले. या खेळाडूंच्या कामगिरीबाबतचा आढावा वेबसंवादात घेतला जाईल. ऑलिम्पियाडमध्ये चार वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारा कुंटे याला २०००मध्ये ग्रँडमास्टरचा किताब मिळाला. भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण आणि चार कांस्यपदके त्याच्या नावे आहेत. बुद्धिबळाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन, आशियाई स्पर्धेत सात पदके कुंटे याने कमावली आहेत. भारतात हा खेळ आज लोकप्रिय झाला, याचे श्रेय विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे यांच्याबरोबरच कुंटेलाही द्यावे लागेल. आताचे युवा भारतीय बुद्धिबळपटू झपाटय़ाने प्रगती करत असून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू राहण्यासाठी आवश्यक पावलांचाही या संवादामध्ये वेध घेतला जाईल.

अनेक मुद्दय़ांवर विश्लेषण..

गेली काही वर्षे कुंटे याने प्रशिक्षणाकडे मोर्चा वळवत भारतासाठी उत्तमोत्तम बुद्धिबळपटू घडवण्याचे कार्य केले. बुद्धिबळातील मोजक्या व्यावसायिक लीगचे यशस्वी आयोजनही त्याने करून दाखवले. बुद्धिबळाची कारकीर्द म्हणून निवड करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, खेळाची राज्यातील आणि देशातील सद्य:स्थिती, राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बुद्धिबळाकडे केले जाणारे दुर्लक्ष, बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या सामन्यात कुणाला अधिक संधी यांसारख्या अनेक मुद्दय़ांचे विश्लेषण कुंटे या कार्यक्रमात करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहभागासाठी http://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_1Dec  येथे नोंदणी करा.