मुंबई : माहीम येथील महानगरपालिकेच्या न्यू माहीम रोड एम. एम छोटानी या शाळेची इमारत धोकादायक जाहीर करण्यात आली असून लवकरच ती पाडण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वीच संबंधित शाळेचे नूतनीकरण करण्यात आले होते. आता शाळा धोकादायक असल्याचे घोषित केल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, या शाळेत शिकणाऱ्या मराठी, हिंदी, कन्नड आदी माध्यमांतील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांचे वरळी येथील सासमिरा जवळील नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड पायपीट होण्याची शक्यता असून या शाळेच्या पाडकामाला विरोध होऊ लागला आहे.
न्यू माहीम रोड एम. एम छोटानी या पालिकेच्या शाळेची २०१७ – १८ मध्ये पुनर्बांधणी झाली आहे. त्यांनतर आता शाळेला धोकादायक घोषित करण्यात आले असून शाळेतील साहित्य अन्य ठिकाणी हलविण्यात येत आहे. या शाळेत अनेक वर्षांपूर्वी सयाजी शिंदे, सुलभा देशपांडे, रत्नाकर मतकरी, अरुण काकडे, रत्ना पाठक शहा आदींसह अनेक नाट्यकर्मींनी नाटकांच्या तालमी केल्या आहेत. मात्र, आता शाळा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यांनतर १७ डिसेंबर २०२४ रोजी शाळेची इमारत सी – १ धोकादायक श्रेणी म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे महापालिकेमार्फत सांगण्यात आले होते. तसेच, न्यू माहीम मनपा शालेय इमारत धोकादायक घोषित केल्यामुळे १६ जूनपासून कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देऊ नये. शालेय इमारतीतील सर्व शिक्षकांनी आपापल्या तासिका तळमजल्यावरील सुरक्षित वर्गखोल्यांमध्येच घ्याव्यात. तसेच मुख्याध्यापकांनी शिपायांच्या मदतीने स्थलांतरीत करायच्या सामानाबाबत सर्व कार्यवाही करावी, जेणेकरून साहित्य स्थलांतरीत करताना वेळेचा अपव्यय होणार नाही, असे पालिकेकडून शाळेला सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत एकही विद्यार्थी शाळेत येणार नाही, याची काळजी सुरक्षारक्षक, माळी, रखवालदार, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी घ्यावी, अशाही सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
दरम्यान, या शाळेचे पाडकाम केल्यानंतर पुन्हा तेथे शाळा बांधली जाईल कि नाही, याबाबत मनात शंका निर्माण झाली आहे. मोरी रोड माहीम शाळेची इमारत पुनर्बांधणीसाठी सुमारे चार वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. मात्र, अद्यापही तिचे बांधकाम झाले नसल्याने पालिकेच्या या शाळेबाबतही हाच प्रकार घडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शाळेची इमारत न तोडता पुन्हा संरचनात्मक परीक्षण करावे, अशी मागणी केली जात आहे. नुकतेच यासंदर्भात आम आदमी पक्षातर्फे पालकांच्या स्वाक्षरीसह शाळा न पाडण्याचे निवेदन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
न्यू माहीम शाळेची इमारत अतिशय मजबूत आहे. त्यामुळे ती पडणे शक्य नाही. इमारतीच्या छताचे प्लाॅस्टर उखडले गेले आहे. त्यांची दुरुस्ती केल्यास शाळेला काहीही धोका नाही. मात्र, शाळेला थेट धोकादायक घोषित करून जमीनदोस्त करण्याचा घाट घातला जात आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
विद्यार्थ्यांची पायपीट
न्यू माहीम रोड एम. एम छोटानी या शाळेत विविध माध्यमांचे सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, पालिकेने शाळा धोकादायक झाल्यामुळे पुनर्बांधणीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वरळी येथील सासमिरा जवळील नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेमार्फत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, माहीम आणि वरळीतील अंतर जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट होणार आहे.
न्यू माहीम शाळेत शाळेत सुमारे अडीच हजार विद्यार्थी असून शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना शीव येथील शाळेत स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. तसेच, उर्वरित विद्यार्थ्यांना वरळीत पाठविण्यात येणार आहे. मात्र, मुलांना एवढ्या दूर पाठविण्याची पालकांची तयारी नाही. शिवाय, अनेक वास्तुविशारदांच्या म्हणण्यानुसार संबंधित शाळेची इमारत सुस्थितीत असून पुन्हा एकदा संरचनात्मक तपासणी करायला हवी. तसेच, माहीम येथील कपडा बाजारात ६५ टक्के शाळा आणि ३५ टक्के मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर एसआरएमार्फत बहुमजली टॉवर उभारण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्या मजल्यावर शाळा भरवली जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे न्यू माहीम शाळेबाबत पालकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, असे आम आदमी पक्षाच्या मुंबई प्रदेश समितीच्या प्रणाली राऊत यांनी दिली.