महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात जी प्रकरणे समोर आली आहेत. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे दिला असून, आता पक्षश्रेष्ठीच पुढील निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये सांगितले. फडणवीस यांनी भाजपच्या मुख्यालयामध्ये अमित शहा यांची भेट घेतली आणि सुमारे ४० मिनिटे बंद खोलीमध्ये त्यांच्याशी चर्चा केली. तेथून बाहेर पडताना केवळ दोन वाक्यांमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. खडसे यांच्यावर एकामागून एक आरोप होऊ लागल्यानंतर त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच अमित शहा यांनी या संपूर्ण प्रकरणांचा अहवाल फडणवीस यांच्याकडे मागितला होता. तोच आज त्यांच्याकडे देण्यात आला. फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेत असून, त्यांच्याकडेही या विषयावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
राज्यातील भाजपच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ होणाऱ्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे नाराज असल्याचे समजते. खडसे यांच्या विरोधातील पुण्यातील जमिनीच्या संदर्भातील आरोपांची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे यापूर्वीच दिल्लीला पाठविण्यात आली आहेत. दिल्लीच्या पातळीवर कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party leaders will take decision about eknath khadse says devendra fadnavis
First published on: 02-06-2016 at 19:14 IST