मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली – दहिसर रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी एक प्रवासी जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. हा प्रवासी लोकलमधून पडून जखमी झाल्याची शक्यता आहे. बोरिवली – दहिसर रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी दुपारी १२.२० वाजता एक प्रवासी जखमी अवस्थेत पडल्याचे एका मोटरमनच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनास्थळी रेल्वे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक पोहचले आणि त्यांनी जखमी प्रवाशाला शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

सलीम वल्ला असे जखमी प्रवाशाचे नाव असून ५५ ते ६० वर्षे वयोगटातील आहे. सदर प्रवासी बेशुद्ध असल्याने त्याची पूर्ण माहिती मिळालेली नाही. प्रवासी शुद्धीवर आल्यानंतर तो कशामुळे जखमी झाला हे समजू शकेल. रेल्वे रूळ ओलांडताना किंवा लोकलमधून पडून प्रवासी जखमी झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली.