मुंबई : गणेशोत्सव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होत आहे. परंतु, कोकणवासियांचे कोकणात जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. यंदा प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखद होण्यासाठी प्रवासी संघटनांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातील आणि मुंबई शहर आणि उपनगरातील कोकणवासियांना पनवेल रेल्वे स्थानक गाठून विशेष रेल्वेगाडीतून प्रवास करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे यावर्षी पनवेलऐवजी एलटीटी, दादर, दिव्यावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी गणपती उत्सवादरम्यान रेल्वेने पुण्याहून फक्त एकच विशेष रेल्वेगाडी चालवली होती. तसेच ही रेल्वेगाडी फक्त रत्नागिरीपर्यंत चालवण्यात आली होती. तर, गेल्या हिवाळी हंगामात आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुण्याहून कोकणापर्यंत एकही विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली नाही. त्यामुळे हंगामी आणि नियमित प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने पुण्याहून कल्याणमार्गे रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा विचार करावा, असे मत कोकण विकास समितीने व्यक्त केले आहे.
दिवसा मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या आणि मुंबई / पुणे ते चिपळूण / रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये द्वितीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित चेअर कार जोडावा. यामुळे शयनयान आणि तृतीय श्रेणी डब्याच्या तुलनेत द्वितीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित चेअर कार डब्यात जास्त प्रवासी सामावतील.
दिवा-रोहा मेमूचा चिपळूणपर्यंत विस्तार करण्याऐवजी सीएसएमटी – चिपळूण विशेष रेल्वेगाडी सोडण्यात यावी. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबे द्यावेत. यासह या मार्गावर आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही रेल्वेगाड्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगात आणि वेळेत होण्यासाठी, गणेशोत्सव काळात मालगाड्या आणि रो-रो सेवा बंद करावी. गाडी क्रमांक २२२२९ आणि गाडी क्रमांक २२२३० सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ करावी, आदी मागणी करण्यात आल्या आहेत. १२ डब्यांच्या मेमू चालवण्याऐवजी, २२ डब्यांची एलएचबी किंवा २४ डब्यांची आयसीएफ रेक असलेल्या रेल्वेगाड्या चालवण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल. तसेच गर्दीच्या दिवशी करंजाडी, सापे वामणे, विन्हेरे, दिवाणखवटी, अंजनी, कडवई, वेरवली, खारेपाटण रोड, आचिर्णे, सौंदळ, झाराप, मडुरे, पेडणे स्थानकांवर नियमित प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त दररोज किमान दोन रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी कोकण विकास समितीच्यावतीने करण्यात आली आहे.