मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांना आरामदायी, वेगात आणि वेळेत प्रवास करता यावा यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली. परंतु, ऐन दिवाळीत वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. भारतीय रेल्वेमधील इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजलेले असताना आता वंदे भारत एक्स्प्रेसच्या लेटलतीफ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवास चांगला होण्यासाठी जादा पैसे मोजूनही दर्जाहीन सेवा मिळत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवारी गाडी क्रमांक २०७०६ सीएसएमटी – नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी १.१० वाजता सुटणे अपेक्षित होते. परंतु या रेल्वेगाडीच्या वेळापत्रकात बदल करून ती दुपारी २.१५ वाजता चालवण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ही रेल्वेगाडी दुपारी ३.२३ वाजता सीएसएमटीवरून सुटली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला. विशेषत: दिवाळीनिमित्त लहान मुले, वृद्ध कुटुंबातील सदस्यासोबत प्रवासी बाहेरगावी निघाले असून त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी प्रवाशांनी वंदे भारत एक्स्प्रेसची निवड केली. परंतु वंदे भारतच्या अनिश्चित प्रवासामुळे गोंधळ निर्माण झाला. सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण या स्थानकांत प्रवासी वंदे भारत एक्स्प्रेसची वाट पाहत होते. वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती प्रवाशांना सकाळी दिली होती. मात्र बदललेल्या वेळेनंतरही एक तास उशिराने वंदे भारत सुटली. परिणामी, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
सोमवारी गाडी क्रमांक २२२२५ सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी ४.०५ वाजता सुटणार होती. परंतु, वेळेत बदल करून ही रेल्वेगाडी रात्री ८.०५ वाजता चालवण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, ही रेल्वेगाडी रात्री ८.२९ वाजता सीएसएमटीवरून सुटली. तर, मंगळवारी गाडी क्रमांक २२२२६ सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस नियोजित वेळेच्या सुमारे दोन तास सीएसएमटी येथे उशिराने पोहचली. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस विलंबाने धावण्यास सुरुवात झाल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
रविवारी सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला गाईने धडक दिली. त्यामुळे वंदे भारतचे नुकसान झाले. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस उशिराने धावत होती. नांदेड – सीएसएमटी, सीएसएमटी – सोलापूर, सोलापूर – सीएसएमटी आणि त्यानंतर सीएसएमटी – नांदेड या मार्गांवरील वंदे भारत एक्स्प्रेसचे रेक शेअरिंग होतात. त्यामुळे एका वंदे भारत एक्स्प्रेसला विलंब झाल्यास, त्याचा परिणाम दुसऱ्या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोगावा लागतो.