पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली. त्यात पूर्व उपनगरातील काही ठिकाणांचा समावेश आहे. ईडीने सुमारे १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही शोध मोहीम राबवली. याप्रकरणी नुकतीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती.

‘ईडी’ने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता ‘एचडीआयएल’कडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे ११२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे आढळले होते. त्यापैकी एक कोटी आठ लाख रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना देण्यात आले. त्यातील ५५ लाख रुपये २००९-२०१० मध्ये कर्जाच्या (असुरक्षित) स्वरुपात वर्षां राऊत यांना मिळाले. त्यातून एक सदनिका खरेदी करण्यात आली. याशिवाय प्रवीण राऊतचे व्यावसायिक संबंध असलेल्या प्रथमेश डेव्हलपर्समार्फत वर्षां राऊत आणि संजय राऊत यांना ३७ लाख ५० हजार रुपयांचा फायदा मिळाला. त्यासाठी वर्षा आणि संजय राऊत यांनी अनुक्रमे १२ लाख ४० हजार व १७ लाख १० रुपये गुंतवणूक केली होती. अवनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतील केवळ पाच हजार ६२५ रुपयांच्या गुंतवणुकीवर वर्षां राऊत यांना १३ लाख ९४ हजार फायदा मिळाला, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दिली. याशिवाय संजय राऊत हे या प्रकरणाच्या कटातही सहभागी असून प्रवीण राऊत याचा मोहरा म्हणून वापर करण्यात आला. प्रवीण राऊत याने संजय राऊत यांच्याशी असलेली जवळीक दाखवून म्हाडाकडून परवानगी मिळवल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राऊत यांच्याकडे आलेल्या रकमेतून आठ करारांद्वारे अलिबागमधील किहिम येथील १० भूखंड खरेदी करण्यात आले. हे करार स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांच्या नावावर आहेत. तसेच पत्राचाळ गैरव्यवहारातील रक्कम व्यवहारात आणण्यासाठी अवनी इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय संजय राऊत कुटुंबियांच्या देश-विदेशातील दौऱ्याचा (प्रवासावर) खर्च प्रवीण राऊतने केल्याचा आरोप आहे