मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकाअंतर्गत उपलब्ध झालेल्या चार भूखंडांवर २३४३ घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठीचे कार्यादेश ऑक्टोबर २०२४ मध्ये देण्यात आले आहेत. मात्र मुंबई महानगर प्रदेशातील गृहप्रकल्पांच्या पर्यावरण परवानगीसंबंधीचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून प्रकल्पास स्थगिती असल्याने पत्राचाळीतील घरांच्या बांधकामास सुरुवात होऊ शकलेली नाही.

पण आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने गृहप्रकल्पाच्या कामावरील स्थगिती उठवून कामाचा मार्ग मोकळा केला आहे. आता मुंबई मंडळाकडून आठवड्याभरात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर २३४३ घरांच्या बांधकामास सुरुवात केली जाणार आहे.

रखडलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास मुंबई मंडळाकडून मार्गी लावण्यात आला आहे. या पुनर्विकासाच्या माध्यमातून मंडळाला नऊ भूखंड विक्री घटकाअंतर्गत प्राप्त झाले आहेत. यातील आर-१ भूखंडावर ५७२ घरे, आर-४ भूखंडावर १०२५ घरे, आर-७ भूखंडावर ५७८ घरे आणि आर-१३ भूखंडावर २५१ अशी एकूण २३४३ घरे बांधण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या कामाचे कंत्राट बहाल करत कंत्राटदारांना ऑक्टोबर २०२४ मध्ये कार्यादेशही जारी करण्यात आले. पत्राचाळीतील या २३४३ घरांच्या बांधकामाच्या अनुषंगाने मुंबई मंडळाने २०२५ च्या सोडतीची घोषणा केली होती.

दिवाळीतील ५ हजार घरांच्या सोडतीत चालू प्रकल्पातील घरांच्या योजनेअंतर्गत या घरांचा समावेश केला जाणार होता. मात्र मुंबई महानगर प्रदेशातील गृहप्रकल्पाच्या पर्यावरणासंबंधीचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने अनेक प्रकल्प रखडले होते, त्यात पत्राचाळीतील प्रकल्पाचाही समावेश होता. कार्यादेश देऊनही वर्षभरापासून या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे २०२५ ची सोडतही पुढे ढकलण्याची वेळ मुंबई मंडळावर आली आहे. मात्र आता या घरांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कामावरील स्थगिती उठवून प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानुसार पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची परवानगी घेण्यासाठी मंडळाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव आठवड्याभरात परवानगीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. कंत्राटदारांने बांधकामाला सुरुवात करण्याची सर्व तयारी केली आहे. पर्यावरण परवनागी वगळता इतर सर्व परवानग्या घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता येत्या काही दिवसातच या घरांच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर २३४३ घरांची कामे सुरू झाल्यास त्यांचा समावेश एप्रिल २०२६ च्या मुंबई मंडळाच्या सोडतीत चालू प्रकल्पातील योजनेअंतर्गत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गोरेगावमध्ये अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी घरांचा एक चांगला पर्याय उपलब्ध होईल, अशी चर्चा आहे. ४७३ चौरस फुटांपासून ते १०१७ चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा समावेश या प्रकल्पात आहे.