संजय दत्तच्या पॅरोलविरोधात उच्च न्यायालयात अखेर याचिका

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार अभिनेता संजय दत्त याला लागोपाठ तीन वेळा मंजूर करण्यात आलेल्या पॅरोलविरोधात अखेर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी दोन स्वतंत्र जनहित याचिका करण्यात आल्या.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार अभिनेता संजय दत्त याला लागोपाठ तीन वेळा मंजूर करण्यात आलेल्या पॅरोलविरोधात अखेर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी दोन स्वतंत्र जनहित याचिका करण्यात आल्या. त्यातील एका याचिकेत संजय दत्तला वारंवार देण्यात येणाऱ्या पॅरोलची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या याचिकेत सामान्य कैदी आणि सेलिब्रेटी कैदी यांना फर्लो किंवा पॅरोल मंजूर करताना भेदभाव का, असा सवाल करीत कारागृह अधीक्षक आणि विभागीय आयुक्त आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रदीप भालेराव यांनी संजय दत्तच्या पॅरोलच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तर पुणे येथील अ‍ॅड्. तुषार पबाले यांनी अ‍ॅड्. निखिल चौधरी यांच्यामार्फत अशीच याचिका केली असून राज्य सरकार, कारागृह अधीक्षक, विभागीय आयुक्त यांच्यासह संजय दत्तलाही प्रतिवादी केले आहे. संजय दत्त सेलिब्रेटी असल्यानेच येरवडा कारागृह अधीक्षक आणि विभागीय आयुक्त यांनी आपल्या पदाचा आणि विशेषाधिकारांचा दुरुपयोग करून त्याला एकामागोमाग एक पॅरोल कुठलाही खंड न पाडता मंजूर केला. संजय दत्तने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मे महिन्यात विशेष न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती. परंतु काही महिने कारागृहाऐवजी तो सतत पॅरोलवर बाहेर आहे. गेल्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातही त्याला लागोपाठ पॅरोल मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुन्हा त्याने आणखी एक महिना मुदतवाढ मागितल्यावर मंगळवारी त्याची ती विनंतीही मान्य करण्यात आली.
याचाच अर्थ गेल्या डिसेंबर महिन्यापासून पत्नीच्या आजारपणाचे कारण देऊन संजय दत्त पॅरोलवर बाहेर आहे. सामान्य कैद्यांना पॅरोल वा फर्लो मंजूर करण्यासाठी कारागृह अधीक्षक आणि विभागीय आयुक्त महिनोंमहिने लावतात. परंतु त्यानंतरही त्यांच्या अर्जावर काहीच निर्णय घेतला जात नाही. यातील बरेच कैदी हे जवळच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी किंवा आजारपणाच्या कारणास्तव पॅरोल वा फर्लो मंजूर करण्याची मागणी करतात. मात्र त्यांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. अखेर त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागते, असेही याचिकेत म्हटले आहे.
याचिकेत या सगळ्याला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश देण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे. शिवाय आतापर्यंत किती कैद्यांनी फर्लो आणि पॅरोलसाठी अर्ज केले आहेत, त्यातील किती जणांना फर्लो किंवा पॅरोल मंजूर वा नाकारण्यात आले आहेत, संजय दत्तप्रमाणे कितीजणांना ते विशेषकरून तीनवेळा वाढवून देण्यात आले आहेत, याची माहिती सादर करण्याचेही आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

संजयला आणखी तीस दिवस पॅरोल
पुणे : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्तला पत्नीच्या वैद्यकीय कारणासाठी आणखी तीस दिवसांच्या संचित रजेत (पॅरोल) विभागीय आयुक्तांनी वाढ केली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी आतापर्यंत संजय दत्तला ९० दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. आता संजय दत्त २१ मार्चपर्यंत येरवडा कारागृहाबाहेर राहणार आहे. कारागृह प्रशासनाकडून देण्यात येणारी तीस दिवसांची अभिवाचन रजा संपवून आल्यानंतर काही दिवसातच संजय दत्तला पत्नीच्या वैद्यकीय कारणासाठी ६ डिसेंबर रोजी तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली होती. त्यानंतर वादंग निर्माण झाले होते.  ८ जानेवारी रोजी संजय दत्तने पत्नीच्या वैद्यकीय कारणासाठी संचित रजा वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार २० जानेवारी रोजी तीस दिवसांची संचित रजा वाढवून देण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pil in hc questions parole extension to sanjay dutt

ताज्या बातम्या