वातानुकूलित लोकल भाडेकपातीच्या हालचाली

निवडणूक येती शहरा..

मुंबई : पुढील वर्षांत मुंबई महानगरात होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो मतदार डोळ्यासमोर ठेवून रेल्वेच्या विविध प्रकल्पांची घोषणा व त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून वातानुकूलित लोकलचे भाडेदर कमी करणे, ठाणे ते दिवा पाचवा व सहावा मार्ग मार्च २०२२ पूर्वी पूर्णत्वास नेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. वातानुकूलित लोकलचे भाडेदर कमी करण्याबाबतचा प्रस्ताव जुलै २०२१ मध्येच पाठविण्यात आला असून लवकरच त्यावर निर्णय अपेक्षित असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिली.

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून करोनापूर्वकाळात दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. करोनाकाळातील र्निबधांमुळे ही संख्या कमी झाली होती. निर्बंध शिथिल होताच प्रवासी संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. प्रवासी वाढताच रेल्वेकडून विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांचा धडाका लावण्यात आला आहे. त्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यानच्या काळात पादचारी पूल, सरकते जिने व प्रवासी सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. पुढील वर्षांत होणाऱ्या पालिका निवडणुकांपूर्वी रेल्वेच्या अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पांच्या उद्घाटनांचा धडाका लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचाच भाग म्हणून १ डिसेंबरपासून सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलही चालवण्यात आली.

प्रवाशांकडून प्रतिसाद मिळावा यासाठीच वातानुकूलित लोकलचे भाडेदर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर धावली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल आणि मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याणदरम्यानही वातानुकूलित लोकल चालवण्यात आली. आता सीएसएमटी ते पनवेल हार्बरवरही लोकल सेवा सुरू झाली. मात्र जादा भाडे दरामुळे प्रवाशांनी या सेवेकडे पाठच फिरविल्याने पश्चिम रेल्वेने नुकतेच वातानुकूलित लोकलचे सर्वेक्षण करून प्रवाशांची मते जाणून घेतली होती. यामध्ये भाडेदर कमी करण्याची सूचना प्रवाशांनी केली. वातानुकूलित लोकल भाडेदराबाबत रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती नुकतेच एका उद्घाटन समारंभप्रसंगी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिली होती. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याबाबत निर्णय होईल, असा अंदाज आहे. यासंदर्भात आलोक कंसल यांना विचारले असता, वातानुकूलित लोकल गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे. त्यात भाडेदर कमी करण्यासंदर्भाचाही पर्याय पुढे आला. जुलै २०२१ मध्येच रेल्वे मंत्रालयाला याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर मंत्रालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय होईल, असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सामान्य लोकलच्या प्रथम व द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांनाही भाडेदरातील फरक भरून वातानुकूलित लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याचा प्रयत्न असून रेल्वे मंत्रालय यावरही निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.

पाचवा-सहावा मार्ग जानेवारीत?

ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गाच्या कामाला गती दिली जात असून ९० टक्क्यांपेक्षाही अधिक कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. ही मार्गिका पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी नवीन मुदत देण्यात आली. मुंबई दौऱ्यावर आलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही प्रकल्पाचा आढावा घेऊन सूचना केल्या होत्या. आता जानेवारी २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती एमआरव्हीसीचे (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी दिली. मार्ग पूर्ण झाल्यास मेल..एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकल प्रवासही सुकर होईल. येत्या एक ते दोन महिन्यांत एमआरव्हीसीकडून मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकातील आणखी काही सरकते जिने व उद्वाहकांचे उद्घाटनही होणार आहे.