मुंबई :- आयआयटी संस्थेत विद्यार्थ्यांची चोरून अश्लील छायाचित्रे काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी एका माजी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आयआयटी संस्थेचा माजी विद्यार्थी आहे.

पवई येथील आयआयटी संस्थेतील मुलांच्या वसतीगृहात हा प्रकार घडला. आरोपी राहुल पांडे (३२) आयआयटीचा माजी विद्यार्थी आहे. आरोपीने जुलै २०२५ मध्ये संस्थेतून एमटेकटचे शिक्षण पूर्ण केले. त्याने संस्थेत प्रवेश करण्यासाठी ओळखीने पास मिळवता होता. संस्थेच्या वसतीगृहातील एका खोलीच तो रहात होता. तो पाचव्या मजल्यावरील शौचालयात जाऊन विद्यार्थ्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे काढत होता. त्याला १२ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची छायाचित्रे काढताना काही विद्यार्थ्यांनी पकडले.

याबाबत माहिती देताना परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले की, याबाबत गुरुवारी रात्री उशिरा संस्थेने तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.