मुंबई : पोलिस कर्मचारी-अधिकारी खडतर परिस्थितीत सेवा बजावत असतात. अनेक पोलीस कल्याण-डोंबिवलीसारख्या दूर भागात राहून मुंबईत येतात. अनेक पोलिसांना तहहयात छोट्या घरात रहावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी पोलिसांना ५०० चौरस फूटांचे घर मिळावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पोलीस दलात कॅान्स्टेबल म्हणून रुजू होताच पोलिसांना घर मिळेल, या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.

जन सहयोग फाऊंडेशनतर्फे पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. यावेळी दक्षिण मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॅा. अभिनव देशमुख, विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, जन सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले की, इतर गुणवंत आणि पोलिसांची मुले यात खूप फरक आहे. पोलीसांना २४ तास सेवेत तत्पर राहावे लागते. पोलीसांना कुटुंबियांसाठी वेळ देता येत नाही. पोलीस कर्मचार्‍यांबरोबर त्यांचे कुटुंबीय खडतर परिस्थितीला तोंड देतात, ते खूप त्याग करतात. अनेक पोलिस दूरचा प्रवास करुन मुंबईत सेवा बजावतात. त्यांना मुंबईतच घर मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

यापुढे पोलिसांच्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या कुठलीही उणीव भासणार नाही. त्यांच्यातील कौशल्य गुण विकसित करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देऊ, पुढील तीन वर्षांत ऑलिम्पिक पातळीवरील जलतरण तलाव उपलब्ध करुन देण्याबरोबरत नायगावमध्ये अत्याधुनिक क्रीडा केंद्र उभारण्यात येईल, असेही भारती यांनी जाहीर केले.

पोलिसांच्या मुलांना शिक्षणात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मुंबई पोलीस दलासारखे दुसरे कुठलेही खाते नाही. पोलीस कधीही ‘नाही’ म्हणत नाहीत. इतर खात्यातील लोक त्यांची सेवा बजावल्यानंतर पुन्हा काम करण्यास तयार नसतात. मुंबई पोलिसांचे तसे नाही.

आज मुंबई पोलीसांची मुले विदेशातही चांगल्या हुद्द्यावर सेवेत आहेत. एका पोलीस कॅान्स्टेबल मुलगा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयात नोकरी करतो. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. गुणवंत मुलांना यशाच्या शिखरावर टिकून राहणे महत्वाचे आहे, असेही भारती यांनी नमूद केले.

जन सहयोग फाऊंडेशनतर्फे पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

दहावीत चांगले गुण मिळालेल्या मुलांनी यशाने हुरळून जाता कामा नये, त्यांना यापुढे आणखी परीक्षांना सामोरे जायचे आहे. स्पर्धा परीक्षांसाठी कठोर मेहनतीची तयारी आणि जिद्द कायम ठेवली पाहिजे, करिअरमध्ये ए आणि बी प्लान डोळ्यासमोर वाटचाल करावी, असा सल्ला धनंजय कुलकर्णी यांनी दिला. पालकांचे कष्ट न विसरता मुलांनी पुढील वाटचाल करावी. पालकांचे कष्ट आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देतात, असे उद्गार डॅा. अभिनव देशमुख यांनी काढले.