मुंबई: प्रभादेवी पुलालगतच्या १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांचे योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय घरे, इमारती रिकाम्या करु देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिला आहे. तुमची घरे तोडायला येतील त्यांना राज ठाकरेंशी बोलणे झाले आहे असे सांगा असे म्हणत राज ठाकरे यांनी योग्य पुनर्वसनाशिवाय प्रभादेवी पूल बंद करून त्याचे पाडकाम होऊ न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. लवकरच प्रभादेवीलगतच्या बाधित १९ इमारतीतील रहिवासी राज ठाकरे यांनी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडणार आहेत.

पुलाचे पाडकाम रखडले

अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी-वरळी उन्नत रस्त्याअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील सध्याचा १२५ वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे. त्यानुसार पूल बंद करून पुलाचे पाडाकम करणे आणि त्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानुसार २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता पूल वाहतुकीसाठी बंद होणार होता. मात्र पुनर्वसनाच्या मुद्यावरुन उन्नत रस्ता प्रकल्पात बाधित होणाऱ्या १९ इमारतीतील रहिवाशांनी पूल बंद होऊ दिला नाही आणि पुलाचे पाडकाम रखडले. आता हा पूल कधी बंद होणार आणि त्याचे पाडकाम केव्हा सुरु होणार याचे कोणतेही उत्तर एमएमआरडीएकडे नाही. अशात एमएमआरडीएला वाहतूक पोलिसांकडून पुन्हा ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे रहिवासी आक्रमक आहेत. त्यामुळे प्रभादेवी पुलाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात आता मनसेनेही यात उडी घेतली आहे. प्रभादेवी पुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या दोन इमारतींपैकी हाजी नुरानी इमारतीतील रहिवाशांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. योग्य पुनर्वसनासाठी पाठपुरावा करण्याची मागणी रहिवाशांनी यावेळी राज ठाकरे यांच्याकडे केली.

या भेटीत राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत घरे रिकामी करु नका असे आवाहन रहिवाशांना केले. योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय कोणी घरे रिकामी करायचा आल्यास त्यांना सांगा की राज ठाकरेंशी बोलून घ्या , असेही रहिवाशांना सांगत एमएमआरडीएला एकार्थाने तंबी दिली आहे. एकूणच मनसेने रहिवाशांची बाजू उचलून धरली असून आता १९ इमारतीतील रहिवासी एकत्रित लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती रहिवासी मुनाफ ठाकूर यांनी दिली.