मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या रात्री किरण गोसावी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात बोलणं झालं होतं, असा दावा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने केला होता. तर साईलचा हा दावा पूर्णपणे खोटा आणि बिनबुडाचा आहे, असे एनसीबीच्या सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले आहे. गोसावी आणि समीर  वानखेडे यांच्यात कॉल झाला नाही. २ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला होता आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ताब्यात घेतले होते. या दोघांना जर एकमेकांचा कॉल आला असता, तर तो वानखेडे यांच्या सीडीआरमध्ये (कॉल डिटेल रेकॉर्ड) दिसला असता आणि मुंबई पोलीस एसआयटी किंवा एनसीबी पथकाला ते सापडले असते, असे सूत्रांनी नमूद केले.

साईलने इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या एका खास मुलाखतीत दावा केला होता की, त्याने गोसावी यांना वानखेडेंचे फोन आल्याचे पाहिले होते. तसेच पैशांच्या डीलबद्दल बोलणं झाल्याचंही त्याने म्हटलं होतं. दरम्यान, “गोसावीने पूजा ददलानीला भेटत असताना प्रभाकर साईलला फोन करण्यास सांगितलं होतं. गोसावीने साईलचा नंबर समीर वानखेडे म्हणून सेव्ह केला होता, त्यामुळे साईल सुद्धा या प्रकरणात गोसावीसोबत सहभागी असू शकतो,” असंही सूत्रांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रूझ ड्रग्स प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी साईलच्या आरोपांना निरर्थक म्हटले आहे. साईल एनसीबी आणि वानखेडेंना दनाम करण्यासाठी वेळोवेळी नवनव्या कथा रचत आहे. साईल हा कोणाच्यातरी सांगण्यावरून हे सर्व करत असल्याचा संशयही अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. आर्यन खानला इतर आरोपींपासून वेगळ्या खुर्चीवर बसवल्याचा साईलचा दावा अधिकाऱ्यांनी खोटा ठरवला आहे. साईलने स्वत: शूट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच भागात आर्यन खानच्या व्यतिरिक्त खुर्च्यांवर इतर अनेक आरोपी बसलेले दिसतात, असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.