‘बालिका वधू’फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला तिचा प्रियकर राहुल राज सिंह याला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या राहुलने अटक टाळण्यासाठी आधी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दिंडोशी न्यायालायने त्याला कुठलाही दिलासा देण्यास नकार देत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. सोमवारी या निर्णयाच्या विरोधात राहुलने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाने राहुलला १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तोपर्यंत त्याला रोज सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान पोलीस ठाण्यात जाऊन हजेरी लावावी लागणार आहे.
प्रत्युषाच्या पालकांनी पोलिसांना पहिल्यांदा दिलेल्या जबाबात आपल्याविरोधात कुठल्याही प्रकारचे आरोप केलेले नाहीत, असा दावा राहुलने अटकपूर्व जामीन अर्जात केला होता. प्रत्युषाने तिच्या आत्महत्येस आपल्याला जबाबदार असल्याची चिठ्ठी वा पत्र लिहून ठेवलेले नाही किंवा तिच्या गळफासामुळे झालेल्या व्रणाऐवजी अन्य कुठल्याही जखमा तिच्या शरीरावर नसल्याचेही राहुलने जामीन अर्जात म्हटले होते.