काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर काँग्रेसने सुधीर तांबेंचं निलंबन केलं. आता सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत विचारलं असता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते सोमवारी (१६ जानेवारी) एबीपी माझाशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सुधीर तांबेंना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तिकीट दिलं होतं. त्यामुळे या शिस्तभंगाचा आणि शिस्तपालनाचा संबंध दिल्लीशी संबंधित आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीला काही शिफारस करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय एआयसीसीच करेल.”

“आणखी कोणाचं निलंबन करायचं असेल तर तारिक अन्वर करतील”

“सुधीर तांबे यांच्या निलंबनाचा निर्णयही केंद्रीय शिस्तपालन समितीने घेतला होता. त्या समितीचे सचिव तारिक अन्वर आहेत. त्यांच्या सहीने सुधीर तांबेंच्या निलंबनाचं पत्र निघालं आहे. त्यामुळे आणखी कोणाचं निलंबन करायचं असेल तर त्यांच्या सहीनेच होईल,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचा : “सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर…”, बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

“सत्यजीत तांबेंच्या निलंबनाची माहिती महाराष्ट्रातून मिळणार नाही”

“सत्यजीत तांबेंच्या निलंबनाची माहिती महाराष्ट्रातून मिळणार नाही. शिफारस महाराष्ट्रातून नक्की जाईल, मात्र निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या पातळीवर होईल. सुधीर तांबेंचं निलंबन झालं आहे. आता त्यापुढे काय कारवाई करायची हा निर्णय तारिक अन्वर घेतील,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

“मविआच्या कुठल्याही एका उमेदवाराला समर्थन करावं अशी चर्चा सुरू”

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, “प्रश्न सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाचा नाही. निर्माण झालेल्या या परिस्थितीत काँग्रेस आणि महाविकासआघाडीच्या सर्व घटकपक्षांनी यातून काय मार्ग काढायचा असा आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा भाजपाच्या विचाराच्या लोकांच्या हातात ही जागा जाऊ नये आणि मविआच्या कुठल्याही एका उमेदवाराला सर्वांना समर्थन करावं, अशाप्रकारची चर्चा सुरू आहे. आता ती चर्चा संपली असेल.”

हेही वाचा : नाशिक पदवीधर निवडणुकीतून धनंजय जाधवांची माघार, म्हणाले, “गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे…”

“नागपूर, नाशिक यांची एकत्रित चर्चा होऊन मार्ग निघेल”

“काही लोकांना त्यात नागपूरचा प्रश्नही उपस्थित केला. त्यामुळे नागपूर, नाशिक यांची एकत्रित चर्चा होऊन मार्ग निघेल. तसेच कोण अर्ज मागे घेत आहे आणि कोण नाही हे अर्धा तासात आपल्याला कळेल,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan comment on suspension of satyajeet tambe sudhir tambe from congress amid election pbs
First published on: 16-01-2023 at 16:21 IST