पाणी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला ५ लाखांचा  पुरस्कार

राज्य शासनाकडून समितीची स्थापना

संग्रहित छायाचित्र

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येत्या १४ जुलै रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रुपये, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती  शासनाच्या वतीने देण्यात आली.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची संकल्पना अमलात आणणारे तसेच जलसंस्कृतीचे जनक म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जलसंधारण, जलसंपदा व पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे. या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाला ५ लाख रुपये व प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ३ लाख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी २ लाख, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह असे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण शंकरराव चव्हाण यांच्या जन्मदिनी येत्या १४ जुलै रोजी करण्यात येणार आहे.

या पुरस्कारच्या निवडीसाठी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prize of rs 5 lakh for the best work in the field of water abn

ताज्या बातम्या