लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या गायनोवेदा फेमटेक प्रा. लिमिटेड या आयुर्वेदिक औषध कंपनीच्या भिंवडी येथील गोदामावर छापा टाकला. या छाप्यात औषधांच्या आवरणावर औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ च्या तरतुदींचे भंग होत असल्याचे आढळल्याने ६ लाख रुपये किंमतीची औषधे जप्त करण्यात आली आहेत. तसेच काही औषधांच्या बाटल्यांवर बॅच क्रमांक तसेच औषधांची मुदत संपण्याचा उल्लेख नसल्याने ३ कोटी ६२ लाख ६० हजार ९०० रुपये किंमतीच्या औषधांच्या वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.

गायनोवेदा फेमटेक प्रा. लिमिटेड ही महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित उत्पादनांची निर्मिती करते. ही उत्पादने अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावीत यासाठी कंपनीने २०२२ मध्ये अभिनेत्री तापसी पन्नू हिला कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जाहीर केले. अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबर रोजी भिवंडीतील नाशिक महामार्गावरील ग्लोबल कॉम्प्लेक्स येथील कंपनीच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने छापा घातला. या छाप्यात औषधांच्या आवरणांवर औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ च्या तरतुदींचे भंग होत असल्याचे आढळून आले. या तरतुदीअंतर्गत रक्तदाब, मधुमेह यासारखे ५६ आजार बरे करण्याबाबत कोणतीही जाहिरात करता येत नाही. तसेच त्याचा उल्लेख औषधांच्या आवरणावरही करता येत नाही. मात्र गायनोवेदा या आयुर्वेदिक औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ लाख आठ हजार ९०० रुपये किंमतीची औषधे जप्त करण्यात आली.

आणखी वाचा-बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या चौथ्या प्रवेश फेरीला १७ सप्टेंबरपासून सुरुवात

औषधांच्या आवरणावर औषध निर्मितीच्या बॅच, मुदत संपण्याची तारीख अशा काही महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख असणे आवश्यक असते. मात्र अनेक औषधांच्या बाटल्यांवर या बाबींचा उल्लेख नसल्याचे आढळल्याने ३ कोटी ६२ लाख ६० हजार ९०० रुपये किंमतीच्या औषधांवर वितरणासाठी बंदी घालण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त दादाजी गहाणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त (गुप्तवार्ता) वि.आर. रवि, सहआयुक्त (कोकण विभाग) नरेंद्र सुपे, सहाय्यक आयुक्त (कोकण विभाग) मुकुंद डोंगळीकर यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली ठाणे अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर आणि गुप्तवार्ता विभाग मुंबईमधील औषध निरीक्षक शशिकांत यादव यांनी केली. अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेल्या व प्रतिबंधित औषधांच्या उत्पादनांची तपासणी करण्यात येत आहेत. हा तपास पूर्ण झाल्यावर संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त वि. आर. रवि यांनी दिली.