मुंबई : रेल्वे स्थानक आणि लांबपल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जातो. रेल्वे मंडळाने २० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ‘रेलनीर’ बाटली एक रुपयाने स्वस्त होणार आहे. त्यामुळे एका लिटर पाण्याच्या बाटलीसाठी १५ रुपयांऐवजी १४ रुपये आणि ५०० मिली बाटलीसाठी १० रुपयांऐवजी ९ रुपये द्यावे लागणार आहेत. संपूर्ण देशभरातील रेल्वे विभागात सुधारित दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील.
‘रेलनीर’ बाटलीबंद पिण्याचे पाणी हा भारतीय रेल्वेचा ब्रॅंड असून इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) ‘रेलनीर’ बाटल्यांच्या पाण्याचा पुरवठा रेल्वे स्थानकात आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये केला जातो. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – कसारा/कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांत, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकांत ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, काही वेळा रेलनीरचे उत्पादन घटल्यावर पाण्याच्या बाटल्यांचा अपुरा पुरवठा होतो. यावेळी भारतीय रेल्वेने निवडलेल्या इतर ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. या बाटल्यांच्या किमतीतही बदल करण्यात आला आहे. एक लिटरच्या बाटलीची किंमत १५ रुपयांवरून १४ रुपये, तर, ५०० मिली बाटली १० रुपयांऐवजी ९ रुपये करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेचे सर्व महाव्यवस्थापक आणि आयआरसीटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात सर्व संबंधित विभागांना २२ सप्टेंबरपासून नवीन दरांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे सात रेलनीर प्रकल्प कार्यान्वित आहेत. या प्रकल्पातून दररोज लाखो रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अंबरनाथ, बुटीबोरी (नागपूर), मानेरी (जबलपूर), मंडीदीप (भोपाळ), कुबेर एक्सटेंशन रामपुरा (राजस्थान), साणंद (गुजरात), औद्योगिक क्षेत्र (भुसावळ) या सात ठिकाणी रेलनीरच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन होते. अंबरनाथ येथील प्रकल्पात प्रतिदिन सुमारे १,७४,००० बाटल्या तयार केल्या जातात. तर, उर्वरित प्रत्येक प्रकल्पात प्रतिदिन अंदाजे ७२ हजार बाटल्या तयार केल्या जातात.
नवीन दराबाबतची माहिती सर्व स्टाॅलधारक, मेल-एक्स्प्रेसमधील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचवली जाईल. तसेच, एक लीटरच्या बाटलीवर छापील किमत १४ रुपये आणि ५०० मिलीच्या बाटलीवर ९ रुपये केली जाईल.- गौरव झा, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबई</strong>