मुंबई : मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकात ”होम प्लॅटफाॅर्म” नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून घाटकोपर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) अप आणि डाऊन मार्गावर लोकल फेऱ्या धावत आहेत. घाटकोपर येथील गर्दीतून प्रवाशांची सुटका होण्यासाठी सहा लोकल फेऱ्या सुरू करण्यात आला. परंतु, दिव्यातील प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागत असताना आणि गर्दीमुळे प्रवाशांचा धावत्या लोकलमधून मृत्यू होत असताना दिवा ते सीएसएमटी लोकल अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दिव्यातील प्रवाशांना दुर्लक्षित केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
मध्य रेल्वेच्या उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचण्यास नेहमी विलंब होतो. तसेच वाढत्या गर्दीचा भार पेलू शकेल, इतक्या लोकल सेवा मध्य रेल्वे वाढवू शकत नाही. मात्र, ”होम प्लॅटफाॅर्म” नसतानाही घाटकोपर-सीएसएमटी लोकल चालवण्यात येत आहेत. घाटकोपर-सीएसएमटी लोकल फेऱ्या चालवण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा अधिकचा कालावधी वाया जातो. तसेच या लोकलनंतर असणाऱ्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडत आहे. त्यामुळे या लोकलचा विस्तार दिव्या स्थानकापर्यंत करण्यात यावा किंवा दिव्यावरून सीएसएमटीला जाणारी विशेष लोकल सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर लोकलमध्ये गर्दीचा भार वाढल्याने धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होत आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास डोंबिवली ते ठाणे दरम्यान धावत्या लोकलमधून पडून मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा ते सीएसएमटी लोकल सेवा चालवण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
सकाळी ८.३७, ९.०९, ९.५७ सीएसएमटी ते घाटकोपर लोकल- सकाळी ९.१६, ९.४६, १०.३५ घाटकोपर ते सीएसएमटी लोकल सकाळी ७.२० वाजता सीएसएमटीवरून दिवा लोकल चालविल्यास, हीच लोकल सकाळी ८.३१ च्या दरम्यान दिव्यावरून चालविणे शक्य होऊ शकते. तसेच विद्याविहार ते दिवा आणि दिवा ते सीएसएमटी अशी लोकल सेवा चालविणे शक्य आहे, असे मत प्रवासी संघटनेने व्यक्त केले.
गेल्या काही वर्षात दिवा येथे बेसुमार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिली आहेत. झोपड्या, चाळी, बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्व उत्पन्न गटातील नागरिक दिव्यात आहेत. अल्प गटातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने असल्यामुळे वाहतुकीचे साधन म्हणून रेल्वे सेवेचा वापर अधिक होतो. दिव्यात लोकसंख्या वाढली. परंतु, त्यातुलनेने नागरिकांसाठी लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत. त्यामुळे घाटकोपर-सीएसएमटी लोकलप्रमाणे दिवा ते सीएसएमटी लोकल चालवणे आवश्यक आहे.- वंदना सोनवणे, अध्यक्ष, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना
कळवा ते कोपर येथे प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. तरी सुद्धा अपुरी रेल्वे सेवा आहे. रखडलेले रेल्वे प्रकल्प अद्याप मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे दिव्यावरून एक-दोन लोकल सुरू करून प्रवाशांचे मृत्यू थांबणार नाहीत. तर, यासाठी रखडलेले कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, दिवा उड्डाणपूल हे प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे. सिद्धेश देसाई, उपाध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ