मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी गोळीबारात ठार झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबायांना मंगळवारी पश्चिम रेल्वेने १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवरील जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार चेतन सिंग याने रायफलमधून १२ फैरी झाडल्या. त्यात त्याचे वरिष्ठ सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) टिकाराम मीना (५७), अब्दुल कादीर (५५), असगर किया (५०) आणि एका अनोळखी व्यक्ती असे चौघे ठार झाले. याप्रकरणी भारतीय दंड संहिता आणि रेल्वे कायद्यातील संबंधित कलमांतर्गत निष्पाप नागरिकांची हत्या आणि सेवा शस्त्राचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

हेही वाचा >>> मुंबई: म्हाडा, झोपुमधील बदल्यांबाबत लवकरच नवे धोरण

उच्चस्तरीय चौकशी

गाडी क्रमांक १२९५६ जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलै रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महासंचालक / आरपीएफ (उच्च प्रशासकीय श्रेणी) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त / पश्चिम रेल्वे पी. सी. सिन्हा; प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त / मध्य रेल्वे अजॉय सदनी; प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक/ उत्तर पश्चिम रेल्वे नरसिंग; प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक / उत्तर मध्य रेल्वे जे. पी. रावत; प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी / पश्चिम मध्य रेल्वे प्रभात यांची समिती चौकशी करणार आहे.

मृत सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) टीकाराम मीना यांच्या कुटुंबियांना  सानुग्रह अनुदानापोटी २५ लाख, रेल्वे सुरक्षा कल्याण निधीअंतर्गत १५ लाख रुपये, ग्रॅच्युटी १५ लाख रुपये, विमा योजनेंतर्गत ६५ हजार रुपये आणि अंत्यविधी खर्चासाठी २० हजार रुपये अशी मदत करण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> आजपासून पुढील सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती; पावणेपाच मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिकाराम मीना हे मूळचे राजस्थानमधील असून ते २०२५ मध्ये रेल्वे सेवेतून निवृत्त होणार होते. त्याच्या पश्चात पत्नी, २२ वर्षांची विवाहित मुलगी आणि १८ वर्षांचा मुलगा आहे.  आरोपी चेतन सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे, असे आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अब्दुल कादीर (५५), असगर किया (५०) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.