मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता रेल्वे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. रेल्वेगाड्यांमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीत प्रत्येकी दोन रेल्वे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
उपनगरीय रेल्वे आणि परिसरात विविध गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यात प्रवाशांचे सामान, लॅपटॉप, मोबाइल चोरी आदी गुन्ह्यांचे प्रकार वाढत आहे. याशिवाय महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंग आदी गुन्हेही घडतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी प्रत्येक उपनगरीय गाडीतील महिला प्रवाशांच्या डब्यात रेल्वे पोलीस तैनात केले आहेत. एका लोकलमध्ये चार रेल्वे पोलीस तैनात असतात. दरम्यान, लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्येही गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांचे सामान चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील आठवड्यात जयपूर एक्स्प्रेसमध्ये अंधेरीदरम्यान एका जोडप्याला चौघांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून लुटले. तर नांदेड विशेष गाडीत भांडुपजवळ डॉक्टर दाम्पत्यावर चोराने हल्ला केला होता. या घटनांची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
याचाच एक भाग म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आता रेल्वे सुरक्षा बलाबरोबर (आरपीएफ) रेल्वे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
रेल्वे पोलीस दलात ७५८ पदे रिक्त
● लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मात्र, रेल्वे पोलिसांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. सध्या मुंबईत २ हजार रेल्वे प्रवाशांमागे एक पोलीस आहे.
● रेल्वे पोलिसांची एकूण ७५८ पदे रिक्त आहेत. अधिकाऱ्यांच्या ६५, तर कर्मचाऱ्यांच्या ६९३ पदांचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांपुढे सुरक्षा पुरविण्याचे मोठे आव्हान आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे रेल्वेचे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी सांगितले.