विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागात पावसाच्या सरींचा जोर वाढला असून अनेक भागात जोरदार सरी येत आहेत. शनिवारी व रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी आल्या. आज, सोमवार व मंगळवारी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भागात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. कोकणातील सरींचा जोर वाढणार असून मुंबई परिसरातही मंगळवारपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
टप्प्याटप्प्याने प्रवास करणारे मोसमी वारे गेले सहा दिवस केरळमध्ये थबकले आहेत. मोसमी वारे पुढे सरकण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याचा अंदाज आहे. दरम्यानच्या काळात राज्यात विदर्भ वगळता इतरत्र वातावरण ढगाळ झाले आहे . त्यातच काही ठिकाणी सरींचा जोर वाढला आहे. शनिवारी कोकणपट्टीतील डहाणू, जव्हार, पालघर, हण्र, राजापूर येथे जोरदारी सरी आल्या. नाशिक, मालेगाव, नेवासा, पंढरपूर, आष्टी येथेही ४० ते ६० मिलीमीटर पाऊस झाला. राज्यातील सर्वाधिक पाऊस मालेगाव येथे ६७ मिमी नोंदला गेला. डहाणू येथे ६४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये शनिवारी रात्री पावसाच्या सरी आल्या.
विदर्भात तापमानात वाढ
विदर्भातील बहुतेक जिल्ह्य़ात आभाळ निरभ्र आहे. दोन दिवसांत या भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश से. वाढ होण्याचा अंदाज आहे.
पर्जन्यभान
दोन दिवसात कोकणपट्टीत सरींचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात काही ठिकाणी ढगांच्या गडागडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला.