मुंबई : तब्बल २० वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र व्यासपीठावर येऊ शकतो, मग तुम्ही एकमेकांशी का भांडता, मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार असून, त्यासाठी आपापसातील मतभेद मिटवून निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मनसैनिकांना दिले. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच, कोणाबरोबर युती करायची हे आपल्यावर सोडा, योग्य वेळी आदेश दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईसह राज्यभरात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा सभागृहात पार पडला. या वेळी बोलतना राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका आणि मराठीच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, प्रामुख्याने पक्षांतर्गत गटबाजी आणि वाद मिटविण्याचे आदेश दिले. यंदा महापालिकेवर सत्ता आपलीच असेल हे लक्षात ठेवा, असा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. संघटनात्मक दृष्टीकोनातून काय करायला पाहिजे याबाबत सूचना केल्या. मात्र बैठकीत शिवसेनेबरोबर (ठाकरे) युतीबाबत काहीही चर्चा झाली नाही, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मानसन्मान दिला पाहिजे. आपल्या वागण्यावरही निर्बंध आणा, असे सांगिल्याचे नांदगावकर म्हणाले.

ठाकरे बंधूंना मुंबईत चांगले यश मिळेल : भुजबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल, असा अंदाज अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महापालिका निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने लढविली असती तर त्यांना जितके यश मिळाले असते, त्यापेक्षा जास्त यश ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढविल्यामुळे येणार आहे,’ असा अंदाज भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येण्याविषयीची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या विधानाला महत्व आले आहे.