रेल्वेतील ‘वाचनयात्रा’ बंद

राज्य मराठी विकास संस्थेचा उपक्रम

राज्य मराठी विकास संस्थेचा उपक्रम

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : ‘रंगवैखरी’ आणि ‘लोकसाहित्य’ स्पर्धेच्या स्थगितीपाठोपाठ राज्य मराठी विकास संस्थेचा ‘वाचनयात्रा’ उपक्रमही मंगळवारपासून बंद करण्यात आला आहे. एकीकडे वर्षभर सुरू असलेला हा उपक्रम रेल्वेचे सहकार्य न मिळाल्याने बंद केल्याचे सांगत राज्य मराठी विकास संस्थेने रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखविले आहे, तर दुसरीकडे आपण उपक्रमाला असहकार्य न केल्याची भूमिका घेत रेल्वे प्रशासनाने हात वर केले आहेत. राज्य मराठी विकास संस्था आणि रेल्वे प्रशासन यांच्या अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे एका चांगल्या उपक्रमाचा बळी गेल्याची चर्चा आहे.

मुंबईहून नाशिक-पुण्याकडे दैनंदिन प्रवास करणारा नोकरदार वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. प्रवासात त्यांना मराठी पुस्तकांचे वाचन करता यावे या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेने रेल्वेशी समन्वय साधून ‘वाचनयात्रा’ हा उपक्रम १५ ऑक्टोबर २०१८ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सुरू केला होता. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई मार्गावरील ‘दख्खनची राणी’ आणि मुंबई-नाशिक मार्गावरील ‘पंचवटी एक्स्प्रेस’ या दोन गाडय़ांमध्ये प्रवाशांना वाचण्यासाठी मोफत पुस्तके उपलब्ध केलेली होती.

ऑक्टोबर २०१९ मध्ये या उपक्रमाचा करार संपुष्टात आला आहे. त्याआधीच संस्थेने नूतनीकरणाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविलेला होता. करार संपून दोन महिने उलटले तरी रेल्वे प्रशासनाने याला प्रत्युत्तर दिलेले नाही. त्यामुळे नाइलाजाने संस्थेने हा उपक्रम मंगळवारपासून बंद केला आहे. उपक्रम अचानक बंद झाल्याने यात ‘वाचनदूत’ म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा आली आहे.

वाचनसंस्कृती वाढीस लागावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला वाचकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत होता. सुरुवातीला दोन्ही गाडय़ांमध्ये मिळून महिन्याला ७०० ते १००० वाचक या उपक्रमाचा लाभ घेत होते, तर वर्षभरात ही संख्या अडीच हजारांवर पोहोचली होती. प्रवाशांकडून विविध लेखक, कवींच्या पुस्तकांची, दिवाळी अंकांची मागणी होत असल्याची माहिती प्रकल्पाच्या वाचनदूतांनी दिली. वाचनयात्रेचा दिवसेंदिवस वाढणारा प्रतिसाद पाहून महाराष्ट्रातील इतर सोळा रेल्वे मार्गावर आणि चार विमानतळांवरही हा उपक्रम सुरू करावा, असा प्रस्ताव राज्य मराठी विकास संस्थेने काही महिन्यांपूर्वी दिला होता; परंतु नूतनीकरणाच्याच प्रस्तावाला संमती न मिळाल्याने प्रकल्प विस्तारही बारगळला आहे.

या संदर्भात राज्य मराठी विकास संस्थेच्या प्रभारी संचालिका मीनाक्षी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आमच्याकडे आल्यास किंबहुना संस्थेने अर्ज दाखल केल्यास आम्ही उपक्रमाच्या नूतनीकरणाचा विचार करू.

– शिवाजी सुतार, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajya marathi vikas sanstha close vachanyatra initiative in railway zws