मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्वसन प्रकल्पाचे आज भूमिपूजन झाले आहे. आता तातडीने कामास सुरुवात करा आणि दोन वर्षात पहिला टप्पा पूर्ण करा, रहिवाशांना तिसऱ्या वर्षाचे भाडे देण्याची गरज पडू नये, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) अतिवेगाने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. काही लोक केवळ भाषण करतात, भाषणाने पोट भरत नाही, विकासाने पोट भरते, विकासाने रोजगार मिळतो आणि हाच विकास आम्ही करत आहोत, रोजगार उपलब्ध करुन देत आहोत, असे म्हणत विरोधकांना धारेवर धरले.

एमएमआरडीएकडून पूर्वमूक्त मार्गाचा विस्तार घाटकोपर ते ठाणे असा केला जाणार आहे. या प्रकल्पात १७०० झोपड्या बाधित होणार होत्या. तेव्हा या झोपड्यांचे पुनर्वसन स्वत करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. पुढे जात ४० वर्षे रखडलेल्या संपूर्ण रमाबाई नगर आणि कामराज नगरचे पुनर्वसन करण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आला. त्यानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीएच्या संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प मार्गी लावण्यास सरकारने मान्यता दिली. सरकारची मान्यता मिळाल्यानंतर एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात ४३४५ झोपड्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले.

झोपु प्राधिकरणाने रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण करून रहिवाशांना दोन वर्षाचे घरभाडे देत झोपड्या रिकाम्या केल्या. पहिल्या टप्प्यातील १५.६३ हेक्टर जमीन रिकामी करून ती जमीन एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रक्रियेत बी जी शिर्के कंपनीने बाजी मारून कंत्राट मिळविले. नुकतेच या कंपनीला कार्यादेश देण्यात आले आहेत. दरम्यान धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांची होती. त्यानुसार हा दिवस निश्चित करून मंगळवारी भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

रमाबाई नगर, कामराज नगरचे पुनर्वसन ४० वर्षांपासून रखडले होते. चांगल्या घरात राहावयास जाण्याचे तेथील रहिवासी स्वप्न पाहत होते. विकासक पुनर्वसनात अडचणी आणत होते. शेवटी विकासकांच्या भानगडीत न पडला सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून मुंबईतील रखडलेले सर्व झोपु प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. त्यानुसार रमाबाई नगर-कामराज नगरचा पहिला संयुक्त भागीदारीवरील सर्वात मोठा, समुह झोपु पुनर्वसन प्रकल्प आता मार्गी लागत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

रमाबाई नगर पुनर्वसन प्रकल्प म्हणजे केवळ झोपडपट्टी पुनर्वसन नव्हे तर हा सामाजिक न्याय साधणारा आणि झोपु योजनेतील आदर्श असा प्रकल्प ठरणार असल्याचा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तर एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या कामाचे कौतुक केले. शिंदे यांनीही यावेळी विरोधकांवर टीका केली. लाकडी बहीण योजना बंद होणार असा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी यावेळी आश्वासित केले. मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत तर विकासाचे वारकरी हवे आहेत. मुंबईकरांना स्थगिती सरकार नको तर प्रगती सरकार हवे असे म्हणत विरोधकांना लक्ष्य केले.