मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास योजनेसाठी घाटकोपर येथील ८४,६३८.७२ चौ. मीटर जागेचा ताबा अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) मिळाला आहे. लवकरच आणखी ७१,७३८.७३ चौ.मीटर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. त्यामुळे आता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पास वेग येणार आहे.
पूर्वमुक्त मार्गाच्या घाटकोपर ते ठाणे अशा विस्तारीकरणात रमाबाई आंबेडकरनगरातील झोपड्या बाधित होणार आहेत. बाधित झोपड्यांसह संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीएकडूनसंयुक्त भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी या दोन्ही सरकारी यंत्रणांमध्ये संयुक्त करारही झाला आहे. झोपु प्राधिकरणाकडे परिशिष्ट -२ तयार करत झोपड्या पाडत भूखंड रिकामे करुन एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याची जबाबदारी आहे.
तर पुनर्वसित इमारती बांधत १४ हजारांहून झोपडीधारकांच्या प्रत्यक्ष पुनर्वसनाची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाकडून पात्रता निश्चित करत मोठ्या संख्येने झोपड्यांचे पाडकाम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान झोपु योजनेसाठी लागणारी रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील झोपड्यांनी व्यापलेल्या जागेपैकी ८४,६३८.७२ चौ. मीटर जागा महसूल आणि वन विभागाच्या अखत्यारीतील होती.
तर ७१,७३८.७३ चौ. मीटर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे या जागा एमएमआरडीएकडे वर्ग करण्यासंबंधीचे अधिकृत दस्तऐवज (शासन ज्ञापन) राज्य सरकारकडून ९ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अधिकृत पत्रानुसार ८४,६३८.७२ चौ. मीटर जागेचा ताबा एमएमआरडीएला मिळाल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील ७१,७३८.७३ चौ.मीटर जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास ही जागाही एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. सध्या एमएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात ४०५३ घरांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.
१४५० कोटी रुपये खर्च २२ मजली सहा पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार असून या इमारतींमध्ये ४०५३ घरांचा समावेश असणार आहे. अशात आता योजनेसाठीची ८४,६३८.७२ चौ. मीटर जागा ताब्यात आली असून आणखी ७१,७३८.७३ चौ.मीटर जागा ताब्यात येणार आहे. त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाला गती मिळण्यास आता मदत होणार आहे.