मुंबई : आंध्र प्रदेशमधील कोरिंगा वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदाच दुर्मीळ वाघाटीला (फिशिंग कॅट) यशस्वीरित्या रेडिओ कॉलर लावण्यात आली आहे. भारतीय वन्यजीव संस्था (डब्लूआयआय) आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) वन्य पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

वाघाटी हा मांजर कुळातील प्राणी आहे. बिबटय़ाच्या हुबेहूब लहान प्रतिकृतीसारखी वाघाटी दिसते. त्यांचा रंग व अंगावरील ठिपके हे बिबटय़ाप्रमाणेच असतात. कोरिंगा वन्यजीव अभयारण्य हे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात असलेले भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कांदळवन क्षेत्र आहे. तेथे जैवविविधतेचा खजिना आहे. त्यात अनेक दुर्मीळ व लुप्तप्राय प्रजातींचा समावेश आहे. दरम्यान, सध्या अभयारण्यातील दोन वाघाटींना रेडिओ कॉलर बसवण्यात आली असून अजून काही प्रजातींना रेडिओ कॉलर लावण्याचे काम सुरु आहे. ही मोहीम म्हणजे जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, प्रजातींच्या हालचालींचा अभ्यास, आणि त्यांचे संरक्षण यासाठी महत्वाचे पाऊल मानले जाते. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी आंध्र प्रदेश वन विभागानेही सहकार्य केले आहे. या अभ्यासातून मिळणारी माहिती केवळ वाघाटीसाठी नव्हे तर संपूर्ण कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी मोलाची ठरणार आहे.

कोरिंगा अभयारण्यात वाघाटींचा अधिवास

संपूर्ण कोरिंगा अभयारण्यात २०१८ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार अंदाजे ११५ वाघाटींचा अधिवास असावा, असा काही संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे.

मात्र ही संख्या अचूक सांगणे कठीण आहे कारण ही प्रजाती रात्री सक्रिय असणारी आणि दिवसभर लपून राहणारी आहे.

कोरिंगा येथील कांदळवन क्षेत्र, दलदलीचे किनारे व भरती-ओहोटीची परिसंस्था हे वाघाटींच्या अधिवासासाठी आदर्श मानले जातात.

अभ्यास का महत्त्वाचा ?

वाघाटी हा आययूसीएनच्या धोकादायक यादीत समाविष्ट असलेला प्राणी आहे. भारतात त्याचा अधिवास मुख्यतः ओलसर भाग, नदीकिनारे आणि कांदळवन क्षेत्रांमध्ये असतो. कोरिंगा हे त्या काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे हा प्राणी अजूनही आढळतो. म्हणूनच येथे सुरू असलेला रेडिओ कॉलर प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात १५ प्रजाती

मांजर कुळातील प्राण्यांच्या एकूण १५ प्रजाती भारतात आढळतात. भारतात असलेल्या एकूण मांजर कुळातील प्रजातींपैकी दहा लहान प्रजाती आहेत. वाघाटी मुख्यत: उंदीर, घुशी अशा कृंतक वंशीय प्राण्यांची शिकार करतात. त्यामुळे त्यांची पर्यावरण आणि अन्नसाखळीत महत्वाची भूमिका आहे. वाघाटी ही भारतातील रान मांजरीनंतर सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे.