Police / मुंबई : सण उत्सवांच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महासंचालकांनी ‘एक मंडळ – एक पोलीस अंमलदार’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एका पोलिसाला मंडळांची जबाबदारी देण्यात येणार आहे. प्रशासन, पोलीस आणि मंडळांशी समन्वय साधून उत्सव पार पाडण्याची जबाबदारी या पोलिसावर असणार आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह अनेक धार्मिक व सांस्कृतिक सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. हे सण उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यात पोलिसांची मोठी कसोटी लागते. या काळात पोलिसांवर मोठा ताण असतो. राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर उत्सव व मिरवणुका पार पडतात.
गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, तंटे टाळणे यासाठी पोलिसांबरोबर सतत समन्वय आवश्यक असतो. त्यामुळे या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस महासंचलाक रश्मी शुक्ला यांनी ‘एक मंडळ – एक पोलीस अंमलदार’ ही नवी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सण उत्सवादरम्यान होणाऱ्या अडचणी त्वरित दूर करणे, कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे, अनावश्यक वाद, गैरसमद, अनुशासनभंग टाळणे, उत्सव यशस्वी होण्यसाठी समन्वय बळकट करणे असा या योजनेचे उद्दीष्ट आहे.
अशी आहे योजना
या योजनेअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंडळाची यादी तयार करण्यात येणार आहे. उपलब्ध अधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक अंमलदाराला एक किंवा दोन मंडळांची जबाबदारी देण्यात येईल. अंमलदार मंडळातील पदाधिकाऱ्यांशी नियमित बैठक घेऊन समन्वय साधतील.
उत्सव सुरू होण्यापूर्वी मंडळाशी सतत संपर्क ठेवणे, बैठकींना उपस्थित राहणे, कायदा-सुव्यवस्थेबाबत अटी स्पष्ट करणे, गर्दी-वाहतूक समस्यांवर त्वरित उपाय करणे, परवानगीविषयक अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही कामे अंमलदाराला पार पाडावी लागणार आहेत.
तसेच नियुक्त अंमलदार, मंडळ व पोलीस ठाणे यांचा व्हॉटस ॲप ग्रुप तयार करून माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे. या योजनेमुळे सण-उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने व सुरक्षिततेत पार पडतील, पोलीस व मंडळांचा समन्वय वाढेल, संभ्रम, वाद, तणाव अडचणी व कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला आहे.