मुंबई : एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडल्या असून त्याच्या आरक्षणालाही सुरुवात झाली आहे. प्रवाशांनी १,३०० पैकी ८५० गाड्यांच्या आरक्षणाला प्रतिसाद दिल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. याबरोबरच परतीच्या प्रवासाचे आरक्षणाही सुरू झाले आहे. लवकरच गट आरक्षणासाठी एसटीच्या जादा गाड्या उपलब्ध करण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या आरक्षित झाल्या असून एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी २,५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात २५ ऑगस्टपासून सुटणाऱ्या १ हजार ३०५ जादा गाड्यांचे आरक्षण २५ जूनपासून सुरू झाले आहे. या जादा गाड्या मुंबई, ठाणे, पालघरमधून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान सुटणाऱ्या १,३०५ जादा गाड्यांपैकी ८५० बसच्या आरक्षणाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. जवळपास तीन हजार आसने आरक्षित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. कोकणातून ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या परतीचा प्रवास सुरू करतील. परतीच्या गाड्यांसाठी ५ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात झाली आहे. महामंडळाने लवकरच ग्रुप आरक्षणही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने २,२०० गाड्या सोडल्या होत्या.

गणेशोत्सवनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेने ७४ विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथून सावंतवाडी, कुडाळ, मडगांवसाठी या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचे तिकीट आरक्षण ४ जुलैपासून सुरू झाले आहे.