मुंबई : दिवाळीनिमित्त दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू असून फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदुषणात प्रचंड वाढ झाली आहे. दिवाळीला सुरुवात झाल्यापासून झोपमोड होत असून आवाज आणि धुरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती वाढली आहे. परिणामी, शिवाजी पार्क परिसरात वास्तव्यास असलेले रहिवासी कमालीचे हैराण झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क रेसिडेंट्स ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट या संघटनेने स्थानिक पोलीस ठाणे आणि मुंबई महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात नियमांकडे दुर्लक्ष करून फटाके फोडले जातात. न्यायालयाच्या आदेशांचेही पालन केले जात नाही. याचबरोबर शिवाजी पार्क परिसर ‘शांतता क्षेत्र’ असूनही येथे फटाके फोडले जातात, असे संघटनेचे प्रतिनिधी वैभव रेगे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून हा त्रास येथील स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

गेल्यावर्षी दादरचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत माने यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क पोलिसांनी रात्री उशिरा शिवाजी पार्क परिसरात गस्त घालून रात्री १० नंतरही फटाके फोडणाऱ्यांविरोधात कारवाई केली होती. यंदाही तशीच परिस्थिती असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी दादर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.

आवाजाची पातळी जास्तच…

गेल्यावर्षी शिवाजी पार्क परिसरात सर्वाधिक आवाजाची नोंद झाली होती. मरीन ड्राईव्ह परिसरात २०२३ मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ९ ते ११.२५ या वेळेत ८२ ते ११७ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. शिवाजी पार्क परिसरात ११.४५ पर्यंत ९५ डेसिबल, तर कार्टर रोड येथे ७२ ते ८५ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. याचबरोबर २०२१ मध्येही शिवाजी पार्कमध्ये सर्वात जास्त १००.४ डेसिबल आवाजाची नोंद गेली होती.

आवाजाची क्षमता

साधारण ८० डेसिबलपर्यंत आवाज मनुष्याला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजाचा त्रास होतो. वाढत्या आवाजामुळे ध्वनिप्रदुषण हा चिंतेचा विषय बनला आहे. वाहने, औद्योगिक यंत्रे, ध्वनीक्षेपक, फटाके इत्यादी व इतर काही उपकरणे ध्वनीप्रदुषणाला कारणीभूत ठरत आहेत.

ध्वनिप्रदूषणाचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो ?

– श्रवणशक्ती कमी होणे : श्रवण क्षमतेपेक्षा अधिक आवाजाच्या सतत संपर्कात आल्यास कानाच्या पडद्यांचे नुकसान होते. परिणामी श्रवणशक्ती कमी होते.

– झोपेचे विकार : अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर थकवा आणि कमी ऊर्जा पातळीमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो. ध्वनिप्रदुषणामुळे झोपेच्या चक्रात अडथळा येतो; ज्यामुळे चिडचिड होते आणि मनाची अस्वस्थता येते.

– हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या : हृदयाशी संबंधित रक्तदाब पातळी, तणाव आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार बळावू शकतात. यापैकी कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा रक्तदाब अचानक वाढू शकतो.