मुंबई – ‘घरबसल्या रेस्टॉरंटला ऑनलाईन रेंटीग द्या आणि दिवसाला ५ हजार कमवा’ अशा भूलथापा देऊन लोकांना फसविण्याचे प्रकार वाढत आहे. जोगेश्वरीतील एका महिलेला अशाच भूलथापा मारून सायबर भामट्यांनी दोन दिवसात ४ लाखांचा गंडा घातला आहे.
फरहीन पठाण (३०) या जोगेश्वरीत राहतात. त्यांना २४ जून रोजी व्हॉटसअपवर अनोळखी क्रमांकाने एक मेसेज आला होता. ‘घरबसल्या पैसे कमवा’ अशा आशयाची ती जाहिरात होती. रेस्टॉरंटला रेंटीग दिल्यास दिवसाला ५ ते ८ हजार मिळतील असा दावा त्या जाहिरातीत करण्यात आला होता. फरहीन यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा त्यांच्या टेलिग्रामवर एक लिंक पाठविण्यात आली. ती लिंक उघडताच कुमारी याशिका नावाच्या एका आयडीवरून फरहीन यांना वेगवेगळ्या रेस्टॉरंटची नावे पाठवण्यात आली. त्यानुसार रेटींग देेऊन फरहीन यांनी त्याचे स्क्रीन शॉट्स पाठवले. त्यानंतर समोरील व्यक्तीने फरहीन यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यावर १८० रुपये पाठवले.
दोन दिवसात ४ लाख गमावले
पुढील व्यवहार करण्यासाठी टेलिग्रामवर आणखी एक लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. ती लिंक उघडली असता तेथे राहुल सैनी नामक एक व्यक्ती होती. त्याने टेलिग्रामवर फरहीन यांचे एक खाते बनविले. त्यावर आधी ४ हजार रुपये भरण्यास सांगितले. फरहीन यांनी तो प्रक्रियेचा भाग असावा म्हणून ते पैसे भरले. त्यावर मिळणारी अधिक रक्कम त्या खात्यावर दिसत होती. त्यामुळे फरहीन यांचा विश्वास बसला आणि त्या सापळ्यात अडकल्या. त्यानंतर तांत्रिक कारण देत फरहिन यांना जाळ्यात अडकवून पैसे मागितले गेले. दोन दिवसात त्यांनी तब्बल ३ लाख ९६ हजार रुपये भरले. कामाचे पैसे तर मिळाले नाहीत उलट भरलेले पैसे देखील मिळत नसल्याने त्यांना संशय आला. अधिक चौकशी केली असता ही सायबर फसवणूक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या फसवणुकी प्रकरणी फरहीन यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कल ६६ (क), ६६ (ड) तसेच फसवणुकीच्या कलम ३१८ (४) आणि ३१९(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पंधरा दिवसातील दुसरी घटना
रेस्टॉरंटला रेटींग देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याची ही ओशिवरा पोलीस ठाण्याची मागील १५ दिवसातील दुसरी घटना आहे. १२ जून रोजी जोगेश्वरी येथे राहणाऱ्या मोहम्मद नगानी (३२) या इसमाची अशाच प्रकारे ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. अशा प्रकारे रेंटींग द्या आणि पैसे कमवा ही सायबर भाटम्यांची जुनी पध्दत आहे. मात्र लोक आमिषाला बळी पडत असल्याने ती आजही प्रभावी ठरत आहे, असे पोलिसांनी सांगितले. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंक ओपन करू नये तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन ओशिवरा पोलिसांनी केले आहे.