राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी बंडखोर अजित पवार गटातील नेत्यांवर टीका केली. यानंतर अजित पवार गटातील नेत्यांकडून रोहित पवार लहान आहेत असं म्हणत प्रत्युत्तर देण्यात आलं. आता वयावरून केलेल्या याच टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच शरद पवारांचं उदाहरण देत अजित पवार गटातील नेते विचारांशी पक्के राहिले नसल्याचा आरोप केला. ते कल्याणमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, “काही लोकांना माझं वय कमी वाटतं आणि शरद पवारांचं वय जास्त वाटतं. त्यामुळे तसं बघितलं तर आम्ही अजूनही पाळण्यातच आहोत. युवकांचा फायदा फक्त निवडणुकीत करून घ्यायचा आणि एखादं राजकीय वक्तव्य केलं, भूमिका मांडली की, पलिकडून सहजपणे उत्तर येतं की ते लहान आहेत.”




“हो आम्ही पाळण्यात आहोत, पण…”
“हो आम्ही पाळण्यात आहोत, पण पाळण्यात असूनही आम्हाला शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार माहिती आहेत. आम्हाला पुरोगामी विचार माहिती आहेत. आम्हाला नैतिकता माहिती आहे. आम्हाला विचाराला पक्कं राहणं माहिती आहे. म्हणजे बघा, लहान बाळालाही या गोष्टी माहिती असतील, तर नेत्यांना या गोष्टी का कळत नाहीत,” असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं.
“त्यांना विचाराला पक्कं राहणं माहिती नसेल, तर…”
“ज्यांना सत्ता भोगली, ज्यांनी मंत्रीपदं घेतली अशा लोकांना शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार, नैतिकता, विचाराला पक्कं राहणं माहिती नसेल, तर त्याला आम्ही काय करू शकतो,” असंही रोहित पवारांनी म्हटलं.
“मला अजित पवारांसारखं व्हायचंही नाही”
सुनील तटकरेंनी कितीही जन्म घेतला तरी रोहित पवार अजित पवार होऊ शकत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांसारखं व्हायचंही नाही. अजित पवार मोठे नेते आहेत. मात्र, मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. मी विचार जपण्यासाठी राजकारणात आलो आहे.”
“आम्ही भूमिका घेतल्याने काही लोकांना आम्ही नेते बनतोय असं वाटतं”
“शरद पवारांबरोबर राहून गेली ३०-४० वर्षे लढणारी फळी अचानकपणे भाजपाबरोबर गेली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या रांगेत असणारे कार्यकर्ते अचानक पुढच्या रांगेत आलो आणि लढत असताना आम्ही भूमिका घेतली. ही भूमिका घेतल्यामुळे काही लोकांना आम्ही नेते बनतोय असं वाटत असेल, तर ते चुकीचं आहे,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
“आम्हाला नेता बनण्याची घाई नाही”
“त्यांना फक्त नेते माहिती आहेत, आम्हाला कार्यकर्ते आणि लोक माहिती आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून लढत राहू. आम्हाला नेता बनण्याची घाई नाही,” असं म्हणत रोहित पवारांनी तटकरेंना टोला लगावला.
हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे, आता फक्त…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
सुनिल तटकरे नेमकं काय म्हणाले होते?
सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. रोहित पवार अकाली प्रौढत्व आल्यासारखे वागतात, जणू जगातील देशातले राजकारण एकट्यालाच कळतं असा त्यांचा अविर्भाव असतो, असे सुनील तटकरे म्हणाले. जे भाजपाबरोबर गेलेत त्यांना कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. त्यावर तटकरे बोलत होते.
अजित पवार हे दादा आहेत, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलात त्यात अजित पवारांचे योगदान मोठे आहे, असं सुनिल तटकरेंनी म्हटलं. तसेच चांगल्या प्रकारे काम करा असा सल्लाही दिला. रोहित पवार माध्यमांमध्ये येण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचाही आरोप तटकरेंनी केला.