मुंबई : धावतपळत लोकल अथवा रेल्वेगाडी पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी पडतात आणि फलाट व रेल्वेगाडीच्या पायदानाच्या मोकळ्या जागेत अडकतात. काही प्रवासी आत्महत्या करण्यासाठी रेल्वेगाडीसमोर उभे राहतात. मात्र प्रसंगावधानता राखून आरपीएफ जवान अशा प्रवाशांचे प्राण वाचवितात. मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाला एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अशा ६६ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि नागपूर या पाच विभागांमधील रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) ‘मिशन जीवन रक्षक’ सुरू आहे. यासह पळून गेलेल्या लहान मुलांची घरवापसी करणे, विसराळू प्रवाशांचे साहित्य शोधून देण्याचे कर्तव्य पार पाडले जाते. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात ऑपरेशन ‘अमानत’अंतर्गत आरपीएफने सुमारे ८५७ प्रवाशांचे २.७७ कोटी रुपये किंमतीचे सामान परत मिळवून दिले. या ८५७ प्रवाशांपैकी ३७७ प्रवाशांचे १.६३ कोटी रुपये किंमतीचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाइल, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. भुसावळ विभागातील १८२ प्रवाशांच्या ५०.४५ लाख रुपये किमतीच्या; नागपूर विभागातील १६८ प्रवाशांच्या ३६.९७ लाख रुपये किमतीच्या; पुणे विभागातील ५८ प्रवाशांच्या १३.९४ लाख रुपये किमतीच्या; सोलापूर विभागातील ७२ प्रवाशांच्या १३.९९ लाख रुपये किमतीच्या सामानाचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा – जुन्या इमारतीतील रहिवाशांची मास्टर लिस्ट ‘शून्य’ होणार! मुंबई मंडळाकडून १४७ घरे मिळणार?

हेही वाचा – अग्नीवीर होण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या केरळच्या तरुणीची मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या

‘मिशन जीवन रक्षक’चा एक भाग म्हणून आरपीएफ जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ६६ जणांचे प्राण वाचवले. यामध्ये मुंबई विभागातील १९, भुसावळ विभागातील १३, नागपूर विभागातील १४, सोलापूर विभागातील ५, पुणे विभागातील १५ जणांचा समावेश आहे. आरपीएफच्या जवानांनी सतर्क राहून प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpf of central railway saved the lives of 66 passengers mumbai print news ssb
First published on: 28-11-2023 at 22:40 IST