Saif Ali Khan stabbing Case new Twist : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री एका चोराने जीवघेणा हल्ला केला होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या इसमाने सैफ अली खानवर चाकूहल्ला केला होता. ज्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम याला अटक केली आहे. पोलीस सध्या शरीफुलची चौकशी करत आहेत, तसेच पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत. अशातच या प्रकरणाच्या तपासातील एक मोठी व आश्चर्यकारक बाब समोर आली ज्यामुळे या खटल्याच्या तपासाला नवं वळण मिळू शकतं.

सैफ अली खानवरील हल्लाप्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानुसार अभिनेत्याच्या घरात कुठेही आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. पोलिसांनी सैफच्या घरातील ज्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या, जे बोटांचे ठसे घेतले होते ते आरोपीच्या बोटांच्या ठशांशी मिळतेजुळते नसल्याचं दोषारोप पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

२० पैकी १९ ठसे जुळले नाहीत

पोलिसांनी सैफच्या घरातील एकूण २० ठसे घेतले होते. सीआयडीने त्यांची तपासणी केली. आरोपीच्या बोटांशी हे ठसे जुळतायत का ते तपासलं. यापैकी १९ ठसे आरोपी शरीफुलच्या बोटांशी जुळले नाहीत. बाथरुम व बेडरूमचे दरवाजे, स्लायडिंग व कपाटाचे हँडल्स, कपाटाच्या दरवाजांवरील ठसे पोलिसांनी घेतले होते. हे ठसे आरोपीशी जुळले नाहीत. केवळ इमारतीच्या आठव्या मजल्यावर सापडलेले बोटांचे ठसे आरोपी शरीफुलच्या बोटांशी जुळले आहेत.

प्रत्येक गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपीचे ठसे मिळत नाहीत : पोलीस

मुंबई पोलिसांतील सुत्रांनी म्हटलं आहे की खूप कमी वेळा अशा प्रकरणात बोटांचे ठसे सापडतात किंवा आरोपीशी जुळतात. १,००० पैकी एखाद्या वेळी बोटांचे ठसे जुळतात. कारण एकाच वस्तूला अनेकांनी स्पर्श केलेला असतो. त्यामुळे बोटांचे ठसे जुळत नाहीत. म्हणूनच बोटांच्या ठशांना प्रमुख पुरावा म्हणून महत्त्वं दिलं जात नाही. तपास करताना, पुरावे गोळा करताना पोलीस त्यावर अवलंबून नसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळावरील चाकू प्रमुख पुरावा म्हणून सादर केला जाणार

दरम्यान, खार पोलिसांनी आरोपीच्या जामीन अर्जाचा विरोध केला आहे. तसेच मुंबई न्यायालयाला सांगितलं आहे की सैफ अली खानच्या मणक्यात ज्या चाकूचा तुकडा अडकला होता तो चाकू, घटनास्थळावर सापडलेला चाकू आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामच्या जप्त केलेल्या शस्त्रांशी मिळताजुळता आहे.