मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांचे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या साकीनाका पोलिसांच्या पथकावर एका अंमली पदार्थ विक्रेत्याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलीस उपनिरीक्षक व एका पोलिस शिपायाला किरकोळ दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:वरही वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अकीन खान (२७) असे आरोपीचे नाव आहे.

कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

साकीनाका पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीचे जाळे उघडकीस आणले होते. एप्रिल महिन्यात साकिनाका पोलिसांनी वसई पूर्वेच्या कामण येथे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून ४ किलो ५३ ग्रॅम वजनाचे ८ कोटी रुपयांचे एमडी (मॅफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

या प्रकरणात सलीम शेख उर्फ सलीम लंगडा (४५) या मुख्य आरोपीला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून कर्नाटकच्या म्हैसूर येथे छापा टाकून १८७ किलो एमडी हे अमली पदार्थ जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार एकूण किंमत ३८१ कोटी रुपये आहे. याप्रकरणात मुंबईतील आतिक खान (२७) याचा समावेश असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांवर अचानक हल्ला

आतिक खान (२७) नावाचा आरोपी अंधेरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवार २४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी डी.एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच आतिकने त्याच्याकडील चाकू काढून पोलिसांना धमकावले व हल्ला केला. या झटापटीत उपनिरीक्षक शशिकांत पाटील (५१) आणि पोलीस शिपाई पंकज परदेशी (३८) यांना किरकोळ दुखापत झाली.

अखेर पोलिसांनी आरोपीवर नियंत्रण मिळवून त्याला अटक केली. आरोपी आतिक खान याला न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांवर हल्ल्याच्या वाढत्या घटना

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि उपनगरांत, पोलिसांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये अमली पदार्थांच्या कारवायांदरम्यान, दारू व मटका विरोधी कारवाईत, तसेच वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांवर वारंवार हल्ले झाल्याची नोंद आहे. धारदार शस्त्राने वार करणे, दगडफेक, काठी किंवा लोखंडी सळईने मारहाण केली जाते.

अटक करताना विरोध व पोलिसांना धमकावणे, गस्ती दरम्यान अचानक हल्ला करणे अशा प्रकारे हल्ले करण्यात येतात.

यापूर्वीच्या काही घटना

  • २० सप्टेंबर २०२५ – (अँटॉप हिल) पोलीस शिपायावर सुऱ्याने हल्ला झाला, हाताला जखम.
  • २५ सप्टेंबर २०२५ – (कल्याण) आरोपींना न्यायालयात हजर करत असताना त्यांना परत आधारवाडी कारागृहात नेण्यासाठी नेत असताना चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. यात एक पोलीस गंभीर जखमी झाला.
  • ७ एप्रिल २०२३ – (जोेगेश्वरी) एनडीपीएस कायद्याअंतर्गत संशयितावर कारवाई करणार्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला. पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी.
  • २५ डिसेंबर २०२४ – (मालाड) वाहतूक कोंडी करणाऱ्या इसमाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर लाकडी दांड्याने हल्ला केला.