क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्यासह पंच प्रभाकर साईलने गंभीर आरोप केले आहेत. या सर्व प्रकराच्या पार्श्वभूमिवर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.  

या गुन्ह्याबाबत समाज माध्यमांवर सतत उलटसुलट चर्चा सुरू आहे. अनेक पंचांची नाव उघड होत आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांकडुन गंभीर आरोप होत आहेत याची कोर्टाला माहिती देण्यात आली. या माहितीचा तपासावर आणि खटल्यावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी एनसीबीकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, प्रभाकर साईल हा या प्रकरणात एनसीबीचा पंच म्हणजेच साक्षीदार होता. रविवारी त्याने समीर वानखेडेंनी पैशांची मागणी केली असा आरोप केला होता. त्यासंदर्भात आता एनसीबीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात त्यांनी प्रभाकरने आपल्या साक्षीवरुन माघार घेतल्याचं एनसीबीने म्हटलं आहे.

दरम्यान, “माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही, असं समीर वानखेडे यांनी कोर्टात म्हटलंय. तसेच माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहे,” असं त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे स्वत: कोर्टाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहीले. यावेळी “मला वैयक्तिकरित्या काही जणांकडून लक्ष्य केलं जातंय. माझ्यावर, माझ्या कुटुंबीयांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खासगी फोटो लिक करण्यात आलेत,” असं वानखेडे यांनी कोर्टात सांगितलं.