मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे काँग्रेस संभ्रमावस्थेत आहे. त्यातच शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या कथित पत्रामुळे या संभ्रमात आणखी भर पडली. संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी थेट काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पत्राद्वारे तक्रार केली. या वृत्तामुळे मोठा गोंधळ उडाला. अखेर दोन्ही नेत्यांनी असे कोणतेच पत्र लिहिले गेले नसल्याचा खुलासा केल्यानंतर या वावड्यांवर पडदा पडला.

महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्याबाबत मतदारसंघांचे गणित कारणीभूत असल्याची बाब काँग्रेस नेत्यांकडून याआधीच उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. आघाडीत तिसरा भिडू नको असे म्हणणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्ली भेटीनंतर ही जबाबदारी आपल्यावर न घेता मनसेसंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.

मात्र त्यांची दिल्ली भेट ही संजय राऊत यांच्या कथित पत्राचा परिपाक असल्याचे वृत्त पसरले. त्यांची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याच्या या वृत्तामुळे दोन्ही पक्षांत संभ्रम निर्माण झाला. सर्वात आधी सपकाळ यांनी यावर स्पष्टीकरण करताना निवडणूक आयोगाकडे गेलेले शिष्टमंडळ हे मतदार याद्यातील घोटाळे व एकूणच निवडणूक प्रक्रियेतील दोष यासंदर्भात होते, यात कोणत्या पक्षाला आघाडी वा युतीत सहभागी करून घेण्याचा मुद्दा नव्हता.

मनसेकडून आघाडी विषयी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. इंडिया आघाडीत एखाद्या पक्षाचा सहभाग करायचा असेल तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील, असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीला सपकाळ उपस्थित न राहिल्याने हा वाद सुरू झाला का, या प्रश्नावर सपकाळ यांनी प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसचे कोणते नेते सहभागी होणार आहेत, हे स्पष्ट केले होते. त्यानुसार जेष्ठ नेते, काँग्रेस कार्य सिमतीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड सहभागी झाले होते. पक्षश्रेष्ठींबरोबर बैठक नियोजित असल्याने मी दिल्लीला गेलो होतो. त्यामुळे काही तक्रार करण्याचा प्रश्न नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्याचा संबंध येत नाही – संजय राऊत

पत्र लिहिल्याची बातमी कुठून कशी आली मला माहिती नाही. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमचे सहकारी आहेत. महाविकास आघाडीतील उत्तम मित्र आहेत. आमच्या चांगला संवाद होत असताना, त्यांच्या केंद्रातील वरिष्ठांबरोबर बोलण्याचा संबंध येत नाही. त्यांच्या पक्षाच्या भूमिकेनुसार वरिष्ठांना विचारावे लागते. त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत जायचे होते, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना केंद्रातील त्यांच्या नेत्यांनी आमच्यासोबत बैठकीला पाठवले. सध्या सुरू असलेल्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.