चंद्रकांत पाटील यांचा इशारा
भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भोगलेल्या संजयमामा शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल करत गद्दारी केली असून त्यांना निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
भाजप सरकारच्या काळात गेल्या साडेचार वर्षांत महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पुनर्वसन, कृषी आदी विभागांत केलेल्या आपल्या कामाचा लेखाजोखा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडला. त्यानंतर माढा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबाबत ते बोलत होते. रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजित नाईक-निंबाळकर आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन अशा तीन जणांची नावे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी केंद्रीय समितीला पाठवली आहेत. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले. संजयमामा शिंदे हे भाजपसोबत होते. मात्र आयत्यावेळी त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली. त्यातूनच उमेदवार निवडीसाठी वेळ लागत आहे. संजयमामांना निवडणुकीत गद्दारीचे फळ भोगावे लागेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
काही ठिकाणी उमेदवारीवरून भाजपचे नेते नाराज झाले असले तरी पक्षात नाराजी दूर करण्याची व्यवस्था आहे. स्थानिक नेते, संघटनमंत्री व त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री या नाराज मंडळींशी बोलून त्यांची समजूत घालत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.