मुंबई : नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमधील नऊ कर्तबगार स्त्रियांना देण्यात येणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’साठीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पुरस्कारांसाठीच्या अंतिम निवड फेरीत परीक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां छाया दातार, वृषाली मगदूम आणि उद्योजिका मीनल मोहाडीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

या पुरस्कारांसाठी कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती पाठवण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले होते.  प्रत्येक प्रस्तावात त्या-त्या स्त्रियांनी लहान, कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वरूपात उत्तम काम करून दाखवले होते. अनेक जणींनी कामाचा आवाका वाढवत विधायक उपक्रम हाती घेऊन इतर स्त्रियांना मदतीचा हातही दिला होता. या सर्व प्रस्तावांमधून विविध निकष लावून प्रस्ताव निवडले गेले आणि अंतिम निवड फेरीत नऊ स्त्रियांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

परीक्षकांपैकी छाया दातार या लेखिका व स्त्रीमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यां आहेत. ‘तरीही शेषप्रश्न’, ‘स्त्रियांचे नाते- जमीन आणि पाण्याशी’, ‘गोष्ट साधी सरळ सोपी’, ‘एका वर्तुळाचा अंत’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. वृषाली मगदूम याही सामाजिक कार्यकर्त्यां असून ‘स्त्री मुक्ती संघटने’च्या माध्यमातून कचरावेचक, बलात्कारित, तसेच कौटुंबिक अत्याचारग्रस्त स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. मीनल मोहाडीकर या स्त्री उद्योजकांसाठीच्या ‘आम्ही उद्योगिनी’ या व्यासपीठाच्या संस्थापक आहेत. स्त्री उद्योजकांना प्रगतीच्या नवीन मार्गाची माहिती करून देण्याचे आणि त्यांना एकत्र आणून आणखी उद्योजिका घडाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे काम त्या करतात.  ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या एका सांगीतिक कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जाणार आहे.

३५० प्रस्तावांतून..

राज्यभरातून आणि बाहेरूनही ‘लोकसत्ता’कडे ३५० हून अधिक प्रस्ताव आले. स्त्रीमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यां छाया दातार, वृषाली मगदूम,उद्योजिका मीनल मोहाडीकर यांनी कठोर निकषांवर दुर्गाची निवड केली.

यंदाच्या नवदुर्गाबाबत..

अंतिम निवड झालेल्या दुर्गाची नावे आणि त्यांच्या योगदानाची माहिती थेट घटस्थापनेपासून (सोमवार) दररोज एक याप्रमाणे ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.

मुख्य प्रायोजक  : ’ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

सहप्रायोजक  : ’महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ’सिडको ’तन्वी हर्बल्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॉवर्ड बाय : ’व्हि एम मुसळूणकर ज्वेलर्स ’दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड  ’जमीन प्रा. लि.