मुंबई : नांदणी मठातून नेलेल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा या पशू पुनर्वसन केंद्रात ठेवण्याबाबत आता महादेवीसाठी कोल्हापूरजवळ वनताराचे केंद्र सुरू करण्याचा तोडगा वनतारा प्रशासनाकडून सुचवण्यात आला आहे. कोल्हापूर जवळील नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनतारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
महादेवी उर्फ माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे याची पूर्ण जाणीव वनतारास आहे. गेल्या अनेक दशकांपासून, ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो असे वनतारा प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नांदणी मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर जवळील नांदणी परिसरात माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. न्यायालय आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास, मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून उच्चाधिकार समितीच्या तज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल. हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि हत्तींच्या देखभाल आणि शुश्रूषेसाठीच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार असेल.
दरम्यान, मठाचे भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल. न्यायालयाकडून आवश्यक सूचना मिळताच वनताराच्या तज्ज्ञांचे पथक संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अंमलबजावणी सुरु करेल. केवळ माधुरी हत्तिणीचे पुनर्वसन करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि सहकार्याच्या भावनेतून, मंजुरी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हा उपक्रम हाती घेण्याचे प्रस्तावित असल्याचे वनतारा प्रशासनाने सांगितले.
वनताराची भूमिका न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची
वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरविणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे, अशी असल्याचे वनताराने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थलांतर केले नाही. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता असेही म्हटले आहे. वनताराचा सहभाग हा सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक निर्देशांनुसार काटेकोर काम करण्यापुरता मर्यादित आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्राण्यांची काळजी घेण्याबरोबरच सामुदायिक सहकार्य यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यानुसार माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल असेही सांगण्यात आले आहे.
केंद्रामधील सुविधा
– सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव.
– पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे.
– लेसर थेरपी आणि उपचार कक्ष
– साखळदंडाशिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा.
– पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद.
– सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना.
– माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म
– पायाचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी झोपण्यासाठी तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे.