मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असणार आहे. एमएसआरडीसीने संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.

राज्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४२१७ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग यापैकीच. समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळा होणार अद्ययावत

‘शक्तिपीठ’ महामार्गाची चाचपणी झाली तेव्हा हा प्रकल्प समृद्धीपेक्षा अधिक लांबीचा अर्थात ७६० किमीचा असेल असे स्पष्ट झाले होते. मात्र आता एमएसआरडीसीने या महामार्गाचे संरेखन अर्थात महामार्ग कुठून आणि कसा जाईल यासंबंधीचा मार्ग निश्चित केला आहे. या संरेखनानुसार आता ‘शक्तिपीठ’ महामार्ग ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असेल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. सुरुवातीला ढोबळमानाने संरेखन ठरविले जाते. मात्र प्रत्यक्षात सविस्तर संरेखन होते, तेव्हा अनेक बाबींचा विचार करून संरेखन करावे लागते. त्यानुसार केलेल्या संरेखनात महामार्ग ४५ किमीने वाढला आहे. आता हे संरेखन अंतिम करण्यासाठी यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : दहावीच्या खालील विद्यार्थ्यांच्या खासगी शिकवणीस मनाई? केंद्राची खासगी शिकवण्यांसाठीची नियमावली जाहीर

आता या संरेखनास मंजुरीची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्याचीही प्रतीक्षा आहे. आराखडा तयार होण्यास आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘शक्तिपीठ’चे संरेखन अंतिम झाल्याने आता ८०५ किमीचा हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा १०० किमीने मोठा असणार आहे. तर ‘शक्तिपीठ’ महामार्ग राज्यातील सर्वात लांब महामार्ग असेल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पवनारपासून प्रारंभ…

‘शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्यादरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून गोवा, पत्रादेवा येथे येऊन संपेल. नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे.

हेही वाचा : धारावीतील भूखंड ‘अदानी’ ला आंदण? गृहनिर्माण विभागाच्या पत्रामुळे संभ्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ हजार हेक्टर जागेची गरज

समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागली आहे. नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग ८०५ किमीचा असून यासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागण्याची शक्यता आहे. तर हे भूंसापदन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान असणार आहे.