मुंबई : व्यावसायिक कारणांसाठी २२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान परदेशात जाण्याची योजना होती. परंतु, ही योजना बारगळल्याने हा दौरा आता रद्द झाला आहे, अशी माहिती अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या वतीने गुरूवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. तसेच, परदेशात जाण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी केलेला अर्ज मागे घेत असल्याचे सांगण्यात आले.

भविष्यात कधी परदेशात प्रवास करायचा असेल तेव्हा न्यायालयाच्या परवानगीसाठी पुन्हा नव्याने अर्ज दाखल केला जाईल, अशी माहितीही शिल्पाच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. तसेच, दिसताक्षणी ताब्यात घेण्याबाबत (लूक आऊट नोटीस) तपास यंत्रणेने बजावलेल्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी कायम ठेवत असल्याचेही सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने शिल्पा हिची मागणी मान्य केली.

दरम्यान, याचिकाकर्त्यांवर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना कुटुंबासमवेत परदेशात जाण्याची परवानगी देता येणार नाही, असेही खंडपीठाने म्हटले होते. त्यानंतर व्यावसायिक कामासाठी शिल्पासह तिचा मुलगाच परदेशात जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावेळी, पतीविरुद्ध माफीचा साक्षीदार का होत नाही, असा प्रश्न न्यायालयाने शिल्पा हिला केला होता. तसेच, त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. तिच्या कुटुंबीयांच्या पार्श्वभूमीची माहिती देखील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तथापि, परदेश दौराच रद्द झाल्याची माहिती शिल्पा हिच्या वतीने गुरूवारी न्यायालयात देण्यात आली.

प्रकरण काय ?

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे संचालक होते. फिर्यादी व्यवसायिक दीपक कोठारी यांनी २०१५ ते २०२३ दरम्यान या कंपनीत ६० कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपनीतील ८७.६ टक्के समाभग या दोघांच्या नावावर होते, कोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये ‘शेअर सबस्क्रिप्शन ॲग्रीमेंट’अंतर्गत कंपनीत ३१.९ कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट अंतर्गत आणखी २८.५३ कोटी रुपये वळवले. मात्र शिल्पा आणि राज यांनी ही रक्कम वैयक्तिक खर्चांसाठी वापरली, असा आरोप करून कोठारी यांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली.