60 Crore Fraud Case Shilpa Shetty Raj Kundra मुंबई : राज कुंद्रा याने व्यावसायिकाच्या ६० कोटी रुपयांच्या केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे देखील नाव समोर आले आहे. यापैकी १५ कोटी रुपये शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यात वळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पैसे शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यात का वळविण्यात आले त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असून यासंदर्भात शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि चित्रपट निर्माता राज कुंद्रा याच्याविरोधात व्यावसायिक दीपक कोठारी याची ६० कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने १८ सप्टेंबर रोजी राज कुंद्राची ५ तास चौकशी केली होती.
वैयक्तिक कामासाठी पैसे खर्च
या चौकशीदरम्यान कुंद्रावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्याची बाजू ऐकून घेण्यात आली. गुंतवलेले पैसे कुठे वापरले आणि कोणत्या उद्देशासाठी खर्च झाले याचा तपास करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान राज कुंद्रा याने ५ कंपन्यांमध्ये पैसे वळविल्याची कबुली दिली आहे. त्यात सतयुग गोल्ड, विहान इंडस्ट्रीज, इसेन्सिशअल बल्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड, बेस्ट डिल आणि स्टेटमेंट इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे. कुंद्राच्या बॅंक खात्याच्या तपशीलांवरून त्याने २५ कोटी रुपये वैयक्तिक कामासाठी खर्च केल्याच आढळले आहे. राज कुंद्राने या ६० कोटी रुपयांपैकी १५ कोटी रुपये पत्नी व अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कंपनीच्या बँक खात्यात वळविल्याची माहिती समोर आली आहे.
शिल्पा शेट्टीच्या खात्यात एवढी रक्कम कशी गेली याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. हे पैसे खात्यात आल्याबद्दल शिल्पा शेट्टीने बिल सादर केले. हे बिल कुठले होते ? ते कसे बनवले गेले ? त्याचा तपास केला जात आहे. कंनपीच्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी यासंदर्भात राज कुंद्राकडून कागदपत्रे मागितली होती. मात्र अद्याप ती सादर करण्यात आलेली नाहीत.
राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीची चौकशी होणार
या प्रकरणात आठवड्याच्या शेवटी आर्थिक गुन्हे शाखा राज कुंद्राला समन्स देऊन पुन्हा चौकशी करणार आहे. त्यानंतर शिल्पा शेट्टीला देखील तपासासाठी बोलावण्यात येणार आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे अनेकदा परदेशात जात असतात, मात्र ते आता देशाबाहेर जाऊ नयेत, म्हणून लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे.
प्रकरण काय ?
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे संचालक होते. फिर्यादी व्यवसायिक दीपक कोठारी यांनी २०१५ ते २०२३ दरम्यान कुंद्रा दांपत्याच्या बेस्ट डील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ६० कोटी ४८लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपनीतील ८७.६ टक्के शेअर्स या दोघांच्या नावावर होते. दरम्यान, एप्रिल २०१५ मध्ये त्यांनी ‘शेअर सबस्क्रिप्शन ॲग्रीमेंट’ अंतर्गत कंपनीत ३१.९ कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट अंतर्गत आणखी २८.५३ कोटी रुपये वळते (ट्रान्सफर) केले. शिल्पा आणि राज यांनी ही रक्कम वैयक्तिक खर्चांसाठी वापरली ,असा आरोप दीपक कोठारी यांनी तक्रारीत केला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात व्यवसायिकाला जाणूनबुजून २६ टक्के शेअर्स देण्यात आले नाहीत, अन्यथा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला (एनसीएलटीमध्ये) माहिती द्यावी लागली असती. तसेच ६० कोटी रुपयांपैकी काही रक्कम सिस्टर कंपनीला दिली गेल्याचे समोर आले आहे.